Wagholi : सत्संगाने प्रेम, दया, करुणा यांसारखे दैवीगुण मनुष्य जीवनात येतात- निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज

एमपीसी न्यूज- सत्संगामधून परमात्म्याची ओळख केल्यानंतरच मनुष्याच्या जीवनामध्ये प्रेम, दया,करुणा, नम्रता यांसारखे दैवी गुण येतात. त्यामुळे मनुष्याने निराकार परमात्म्याची ओळख करून घेतली पाहिजे असे आवाहन संत निरंकारी मिशनच्या प्रमुख, सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी केले. वाघोली येथे आयोजित केलेल्या विशाल निरंकारी संत समागम सत्संग कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात मंगळवारी (दि.२८) संध्याकाळी ५ ते रात्रीसाडेआठ या वेळात वाघोली येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये विशाल निरंकारी संत समागम संपन्न झाला. या संत समागमामध्ये संपूर्ण पुणे जिल्हा आणि आजुबाजुच्या जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येने निरंकारी भक्तगण उपस्थित होते.

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, ” ज्या परमात्म्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्या परमात्म्याची ओळख करणे हे मनुष्य जन्माचे आद्य कर्तव्य आहे. परमात्म्याची ओळख केल्यानंतरच मनुष्याच्या जीवनामध्ये प्रेम, दया, करुणा, नम्रता यांसारखे दैवी गुण येतात. मनुष्य जन्म हा अनमोल आहे. परंतु क्षणभंगुर सुद्धा आहे. त्यामुळे मनुष्याने निराकार परमात्म्याची ओळख करून घेतली पाहिजे”

या समागमाद्वारे आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून जगामध्ये मानवता, विश्वबंधुत्व आणि शांतीसुखाचे वातावरण स्थापित करणारा मिशनचा सत्य, प्रेम व एकात्मतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. संत समागमामध्ये मिशनमधील विद्वान वक्ते यांनी आपले अनुभवसंपन्न विचार, भक्तीरचना आणि कवितांच्या माध्यमातून आपले भाव व्यक्त केले.

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कल्याण यात्रेचा पुढील कार्यक्रम 31 जानेवारी रोजी वाई, सातारा या ठिकाणी होणार असून यानंतर कोल्हापूर, पंढरपूर, मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी समागम संपन्न होणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.