World cup 2023: अखेरच्या सामन्यात भारतीय संघाचा दणदणीत विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – सलग 9 सामने विश्व कप स्पर्धेत (World cup 2023) जिंकून ऑस्ट्रेलियन संघाच्या विक्रमाची बरोबरी करणाऱ्या भारतीय संघाने तुलनेने दुबळ्या नेदरलँड संघाचा 160 धावांनी दणदणीत पराभव करत आपली विजयी घोडदौड चालूच ठेवली आहे.

साखळी स्पर्धेतला अंतिम सामना यजमान भारतीय संघाचा आज नेदरलँड संघासोबत होता. उपांत्यफेरीचे चारही संघ या सामन्याआधीच मिळाले असल्याने तसे या सामन्याला फारसे महत्व नव्हते पण तरीही आतापर्यंत अजिंक्य राहिलेल्या भारतीय संघाने 100% व्यावसायिक दृष्टिकोन ठेवत आपल्या अखेरच्या सामन्यातही संपूर्ण ताकदीने खेळ करत विक्रम रचताना दणदणीत विजय मिळवला.

Dighi : जनावरे चोरून त्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अतिशय शानदार फॉर्मात असलेल्या (World cup 2023) भारतीय संघाने या विश्वकप स्पर्धेत यजमानपदाला जितक्या उत्तमपणे न्याय दिला,तितक्याच शानदार पध्दतीने संघाने एकापेक्षा एक अशा दिग्गज संघाला चारी मुंड्या चित करत सलग 8 विजय मिळवून इतर संघांना कडक इशारा दिलाच होता. आज ते आपल्या सलग नवव्या विजयासाठी नेदरलँड या तशा तुलनेने नवख्या पण एका जिगरबाज संघासोबत बंगलोरच्या चिंनास्वामी मैदानावर लढणार होते ज्यात नाणेफेकीचा कौल रोहितच्या बाजूने लागला.आज भारतीय संघाने आपल्या विजयी संघात काहीही बदल न करता उपांत्यफेरीच्या सामन्याचा सराव करण्याच्या दृष्टीने तोच विजयी संघ कायम ठेवणे पसंत केले.

आज भारतीय डावाच्या सुरुवात करताना गील आणि रोहित शर्मा जोडीने अतिशय स्फोटक अंदाजात केली.दोघेही फलंदाज एकमेकांना सुयोग्य साथ देत नेदरलँड संघाच्या गोलंदाजीवर तुटून पडले होते.पण यात पहिली बाजी मारली ती शुभमन गीलने.त्याने बघताबघता कर्णधार रोहितलाही मागे टाकत पहिल्यांदा अर्धशतक नोंदवले.हे त्याचेचे एकूण बारावे, विश्वकप मधले 3रे अर्धशतक जे केवळ 30 चेंडूत आले,ज्यात 3 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार सामील होते,आणखी एक खास म्हणजे पठयाने 2023 सालात 1500 धावा ही पूर्ण केल्या आहेत ,त्याच्या या फटकेबाजीमुळे भारतीय सलामीने 12 व्या षटकाच्या आतच शतकी भागीदारी पूर्ण केली.दुसऱ्या बाजूने रोहितही त्याच्या चिरपरिचित शैलीत खेळत होता, ही जोडी चांगलीच जमलीय असे वाटत असतानाच गील अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर लगेचच आणखी एक षटकार मारण्याच्या नादात सीमारेषेवर झेलबाद झाला.

तो बाद झाल्यावर मैदानात टाळ्यांच्या कडकडाटात विराट कोहली उतरला.दुसऱ्या बाजूने रोहित शानदार खेळत होताच,थोड्याच वेळात त्यानेही आपले 55 वे अर्धशतक पुर्ण केले.हे करताना त्याने ए बी डीच्या नावावर असलेल्या एका वर्षात मारलेल्या 58 षटकाराच्या विक्रमालाही नेस्तनाबूत करत आपल्या नावावर आणखी एक मोठा विक्रम नोंदवला.कसोटी क्रिकेटमधे भलेही रोहितला आपल्या दर्जाला तितका न्याय देता आला नसेलही, पण एकदिवसीय क्रिकेटमधील तो जगातील सर्वात खतरनाक खेळाडू आहे हे त्याने वारंवार सिद्ध केलेले आहे.

त्यातच कर्णधार झाल्यापासून तर त्याच्या एकंदरीत देहबोलीतही प्रचंड सकारात्मक बदल झाला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एकदा विश्वकप जिंकेल अशी अपेक्षा करोडो भारतीय समर्थकासह देशभरातील मोठमोठ्या समीक्षकानाही आहेच.या स्पर्धेत भारतीय संघ तो विश्वास पावलोपावली सार्थ ठरवत अजिंक्य तर राहिलाच पण त्याच सोबत सर्वप्रथम उपांत्यफेरीतही दाखल झालेला आहेच.तिसरे विश्वकप जेतेपद आता फ़क्त दोन पावलावर आहे,त्यात भारतीय संघाला नक्कीच यश मिळावे हीच प्रार्थना आणि अपेक्षा भारतातील प्रत्येक क्रिकेटवेड्या चाहत्यांची असेल.

रोहित आज पुन्हा एकदा मोठ्या खेळीकडे वाटचाल करत आहे असे वाटत असतानाच तो वैयक्तिक 63 धावांवर असताना एक उंच फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला, पण त्याने बाद होण्याआधी संघाला खूपच शानदार सुरवात करुन दिली होती.त्याने 54चेंडूत 8 चौकार आणि दोन षटकार मारत या धावा केल्या. त्याच्या जागी खेळायला आला तो या स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी करत असलेला श्रेयस अय्यर.बघताबघता या जोडीने जलदगतीने धावा करत अर्धशतकी भागीदारी नोंदवली.दोघेही आक्रमक आणि आकर्षकरित्या खेळत होते. विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय करीयरमधे एक अतिशय खराब काळ आला होता, त्यातून तो तावूनसुलाखून बाहेर पडला आणि आज त्याचे बावनकशी सोने झाले आहे असे वाटावे असा खेळ तो या वर्षभरात सातत्याने करत आहे.या वर्ल्डकप मधे तर त्याने सर्वाधिक धावा करुन संघाच्या मिशन वर्ल्डकपचे ध्येय पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण फलंदाजी करत संघातल्या अनुभवी सदस्याचे कर्तव्य चोख पार पाडले आहे.आजही त्याने आपले 71 वे अर्धशतक पूर्ण करतानाच या विश्वकप 593 धावा करून आफ्रिकेच्या डिकॉकलाही मागे टाकत विश्वकप स्पर्धा 2023 मध्ये सर्वाधिक धावा करण्यात यश मिळवले आहे.

तो पूर्ण भरात येतोय असे वाटत असतानाच तो स्थिर झाल्यानंतर सुद्धा वानडरमर्व्हच्या एका सरळ येणाऱ्या चेंडूवर साफ चकला आणि स्वतःसह असंख्य चाहत्यांनाही निराश करत तंबूत परतला. त्याने शतकांचे अर्धशतक करावे म्हणून त्याचे असंख्य चाहते वाट बघत आहेत,आज तरी त्या साऱ्यांच्या पदरी निराशाच पडली.विशेष बाब म्हणजे या विश्वकप स्पर्धेत विराट पहिल्यांदच स्पिनरला बाद झाला. यानंतर खेळायला आला तो स्थानिक खेळाडू के एल राहुल.त्याच्या साथीने खेळताना श्रेयसने थोड्याच वेळात आपले या विश्वकप स्पर्धेतले चौथे अर्धशतक पूर्ण केले जे केवळ 49 चेंडूतच आले.या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाच्या पहिल्या चारही फलंदाजांनी अर्धशतक पूर्ण केले आणि अशी कामगिरी करणारा भारतीय संघ या स्पर्धेतला पहिला आणि एकमेव संघ ठरला आहे.

या विक्रमात नंतर तेंव्हा भर पडली जेंव्हा के एल राहुलनेही वाहत्या गंगेत हात धुवून घेत आपलेही अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर हो जोडी फेविकॉलच्या जोड सारखी चांगलीच जमली फक्त फरक एवढाच होता की ती टुकुटूक करत नव्हती,अतिशय आक्रमक अंदाजात नेदरलँडच्या गोलंदाजीवर तुटून पडले.बघताबघता श्रेयसने आपले विश्वकप स्पर्धेतल्या या आधी दोन वेळा हुकलेल्या शतकाला आज पूर्ण करत आपले विश्वकप स्पर्धेतले पहिले आणि एकूण 4 थे शतक पूर्ण करुन संघ व्यवस्थापण त्याच्यावर का भरोसा दाखवत होते हे सिद्ध केले.त्याला साथ देता देता राहुलने पण टॉप गीयर टाकला आणि एक तुफानी खेळी करत केवळ 62 चेंडूत शतक पुर्ण करत वेगवान शतक मारले.हे राहूलचे 7 वे शतक ठरले.या जोडीने 5 व्या गड्यासाठी 208 धावांची मोठी भागीदारी जोडत संघाला चारशे धावांचा मोठा टप्पाही पार करुन दिला. या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने आपल्या निर्धारित 50 षटकात 4 गड्यांच्या बदल्यात 410 धावा पूर्ण करून नेदरलँड संघापुढे धावांचा मोठा डोंगर उभा केला.नेदरलँड संघाकडून लिडेने 2 विकेट्स तर वेनडरसेन आणि मिकरेनने प्रत्येकी एकेक गडी बाद केला.

या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड संघाची अतिशय खराब अशी सुरुवात झाली. मोहम्मद सिराजने आपल्या पहिल्या आणि डावाच्या दुसऱ्या षटकातल्या चौथ्याच चेंडूवर बारेसीला बाद करुन भारतीय संघाला अपेक्षित असे पहिले यश मिळवून दिले,त्यानंतर मात्र ओडोओ आणि अकरमॅन या जोडीने भारतीय तोफखान्याचा नेटाने तोंड देत 56 धावांची भागीदारी करत चांगलीच लढत दिली.अखेर कुलदीप यादवने अकरमॅनला पायचीत करुन ही जोडी फोडली तर त्यानंतर थोड्याच वेळात जडेजाने ओडोओला त्रिफळाचित करत भारतीय संघाला तिसरे यश मिळवून दिले.यानंतर नेदरलँड संघाच्या कर्णधाराची विकेट विराट कोहलीने मिळवत आपल्या गोलंदाजीचीही कमाल दाखवली.

या सामन्याआधीच भारतीय संघ उपांत्यफेरीत डेरेदाखल झाला असल्याने आणि या सामन्याचा निकालही जवळपास पक्का झाल्याने भारतीय कर्णधार रोहितने आज कोहलीसोबत गील,सुर्यकुमार यादवलाही गोलंदाजीचा सराव करण्याची संधी दिली, त्यात कोहलीने एक विकेटही मिळवली.84 चेंडूंत 200 हुन अधिक धावांचे अशक्यप्रयोग आव्हान नेदरलँडचा अर्धा संघ तंबूत परतल्यावर रोहितने आपल्या मुख्य गोलंदाजांना थोडा वेळ बाजूला ठेवत कामचलाऊ गोलंदाजी वापरून बघितली.

 

त्यानंतर त्याने पुन्हा एकदा आपले मुख्य गोलंदाज आक्रमनाला लावत नेदरलँडसंघाचे शेपूट वळवळणार नाही याची खबरदारी घेतली.पण तरिही ज्या भारतीय गोलंदाजांपुढे मोठमोठ्या संघाची दाणादाण उडालो त्याच भारतीय गोलंदाजीपुढे नेदरलँड संघाने चिवट प्रतिकार दाखवत 250 धावांची चांगलीच मजल मारत क्रिकेटरसिकांच्या मनात नक्कीच जागा मिळवली असेल.नऊ विकेट्सच्या पतनानंतर कर्णधार रोहितने स्वतः गोलंदाजी करत आपल्या 5 व्याच चेंडूवर विकेट मिळवत संघाला 160 धावांनी विजयी करुन दिले. या विश्वकप स्पर्धेतले आपले पहिले शतक ठोकणाऱ्या श्रेयस अय्यरला सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले.

येत्या 15 नोव्हेंबर रोजी उपांत्यफेरीचा पहिला सामना यजमान भारत विरुद्ध न्यूझीलंड या संघात तर दुसरा सामना 16 तारखेला दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा होणार आहे.भारतीय संघ आपली हीच धडाकेबाज कामगिरी उपांत्यफेरीतही कायम ठेवून न्यूझीलंड संघाने 2019 च्या उपांत्यफेरीत केलेल्या पराभवाची सव्याज परतफेड करणार का हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.