World Cup 2023 : भारताचा अंतिम सामन्यात होणार ऑस्ट्रेलियाशी मुकाबला; ऑस्ट्रेलिया आठव्यांदा अंतिम फेरीत

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – 213 धावांच्या किरकोळ वाटणाऱ्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाची काही प्रमाणात दमछाक झाली खरी पण जिद्दी आणि खडूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने दडपणाखाली उत्तम नव्हे सर्वोत्तम खेळ करत दक्षिण आफ्रिका संघाला 3 गडी राखून पराभूत करत विश्वचषक स्पर्धेत (World Cup 2023) विक्रमी आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करत आफ्रिका संघाला पुन्हा एकदा निराशेच्या खोल गर्तेत टाकले आहे.

संपूर्ण क्रिकेट विश्वात चोकर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाचा डाव आजच्या महत्वपूर्ण अशा उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात अतिशय स्वस्तात आटोपला. त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध आपल्या निर्धारित 50 षटकात अतिशय खराब खेळ करत केवळ 213 धावांचे माफक आव्हान उभे केले होते. फलंदाजांनी केलेल्या चुका गोलंदाज तरी टाळतील का आणि काही तरी चमत्कार करतील का हे बघणे औत्सुक्याचे होते. खरे तर आफ्रिकन गोलंदाजांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत ऑस्ट्रेलियन संघाला झुंजवले खरे पण अखेरीस कांगारू आफ्रिकन संघावर भारी पडले आणि त्यांनी एक झुंजार विजय मिळवून विक्रमी आठव्यांदा (World Cup 2023) अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

विश्वकप 2023 (World Cup 2023) ची स्पर्धा आता समारोपाच्या पर्वाकडे चालली आहे. यजमान भारतीय संघाने सुरवातीपासूनच या स्पर्धेत आपल्या धडाकेबाज खेळाने प्रस्थापित केलेले वर्चस्व कायम ठेवत काल न्यूझीलंड संघाला 70 धावांनी पराभूत करत अंतिम सामन्यात आपली जागा पक्की केलेली आहेच. त्यांच्याविरुद्ध 19 नोव्हेंबरला अहमदाबाद येथे कोण लढणार या प्रश्नाचे उत्तर आज तमाम क्रिकेट विश्वाला ‘ऑस्ट्रेलिया’ असे मिळाले. येत्या रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर जेतेपदासाठी लढाई होईल.

सिटी ऑफ जॉय म्हणजेच कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर आज विश्व कप 2023 चा (World Cup 2023) दुसरा उपांत्य फेरीचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघात खेळला गेला, ज्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला,पण त्यांच्या डावाची सुरवात अतिशय खराब अशी झाली.

डावाच्या पहिल्याच षटकात त्यांच्या कर्णधार टेम्बा बवूमाने मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर इंग्लिसच्या हातात झेल देवून तंबूचा रस्ता धरला. बाऊमाला या संपूर्ण स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी करता आली नाही,आजच्या महत्वाच्या सामन्यात तर तो भोपळाही फोडू शकला नाही. जहाज संकटात सापडल्यावर कॅप्टनने अखेरच्या श्वासापर्यंत लढायचे असते असे म्हणतात, पण बाऊमाने कदाचित ती गोष्ट वाचलीच नसावी. या धक्क्यातून सावरण्याआधीच त्यांचा या विश्वकप स्पर्धेतला सर्वात यशस्वी खेळाडू डीकॉकही आपल्या कर्णधाराच्या वाटेने मार्गस्थ झाला, अन दक्षिण आफ्रिका चोकर्स म्हणून का ओळखली जाते, याचे अस्सल उदाहरण पुढील काहीच वेळात डोळ्यासमोर साक्षात उभे राहीले.

1 बाद 1, 2 बाद 8 ते 4 बाद 24 अशी केविलवाणी अवस्था त्यांची झाली आणि ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा एकदा (World Cup 2023) अंतिम फेरीत शानदाररित्या पोहचणार असे खात्रीपूर्वक वाटू लागली. क्रिकेटला नेहमीच अनिश्चितता असलेला खेळ म्हटले जाते. यात कधीही शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोवर काहीच सांगू नये, असेही नेहमी म्हटले जाते, पण यात कदाचित आता असेही म्हटले जाईल, महत्वाच्या वा नॉक आऊट सामन्याचा निकाल तुमच्याच बाजुने लागेल, जर का तुम्ही दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध लढणार असाल.

4 बाद 24 या कठीण परिस्थितीत दक्षिण आफ्रिका संघ सापडलेला असताना डेविड मिलर आणि हेन्रीक क्लासेन ही सर्वात अनुभवी जोडी मैदानात घट्ट पाय रोवून उभी राहिली, अन हळूहळू परिस्थिती समजून घेत त्यांनी सावधगिरी बाळगत डाव सावरायला सुरवात केली.

क्लासेन हा या फॉरमॅट मधला सर्वांत खतरनाक खेळाडू मानला जातो, त्याला योग्य वेळी सूर गवसतोय असे वाटत असतानाच ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्सने ट्रेविस हेडला गोलंदाजीला आणण्याचा जुगार खेळला आणि हेडने जम बसत असलेल्या क्लासेनची 47 धावांची छोटी पण महत्वपूर्ण खेळी संपुष्टात आणून कर्णधार कमिन्सने जुगार नाही तर योग्य खेळी केली हेच सिध्द करत आफ्रिका संघाला पुन्हा एक मोठा धक्का दिला. अन पुढच्याच चेंडूवर यांसेंनला आल्या पावली परत पाठवून 4 बाद 119 वरुन आफ्रिका संघाची अवस्था 6 बाद 119 अशी केली.

यावेळी दक्षिण आफ्रिका संघ पुरता अडचणीत दिसत होता अन त्यांच्यासाठी रक्षक /तारणहार एकच उरला होता तो म्हणजे एकदिवसीय क्रिकेट सामन्यातला किलर म्हणून ओळखला जाणार मिलर. आज मात्र मिलरला आपल्या लौकिकाला बाजूला ठेवून प्रगल्भ खेळी करण्यातच संघहित आहे हे प्रकर्षाने जाणवले आणि पटलेही. त्याने खरोखरच आपल्या धडाकेबाज प्रतिमेच्या विरुद्ध पण अतिशय महत्वपूर्ण खेळी करून डाव सावरायला सुरुवात केली. बघताबघता त्याने आपले 25 वे अर्धशतक पूर्ण करुन ” मै हू ना” असेच संघ नायक आणि व्यवस्थापन यांना सांगितले. त्याला गेराल्डने पण चांगली साथ देत आफ्रिकन डावातली दुसरी अर्धशतकी भागीदारी नोंदवली.

ही जोडी संघाला बऱ्यापैकी सन्मानजनक धावसंख्या गाठून देईल असे वाटत असतानाच कमिन्सने गेराल्डला एका उत्तम चेंडूवर चकवत ही भागीदारी तोडली.ऑस्ट्रेलियन संघ बऱ्यापैकी आघाडीवर असे वाटत होते, पण आफ्रिकन संघासाठी सारे काही संपले नव्हते. डेविड मिलर अजूनही मैदानात होता आणि तो एकहाती किल्ला लढवतही होता‌ आणि त्याने या अतिशय महत्वाच्या सामन्यात शब्दशः एकाकी लढत देत खतरनाक/भेदक अशा ऑस्ट्रेलियन पेस बॅटरी समोर जबरदस्त खेळ करत आपले या विश्वकप स्पर्धेतले पहिले शतक पूर्ण करत संघाला सावरण्यात खूप मोठा वाटा उचलला.

त्याला दुसऱ्या बाजूने फारशी साथ मिळाली नसल्यानेच आफ्रिकन संघ आजच्या या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघापुढे फारसे आव्हान उभे करूच शकला नाही. शेवटच्या दोन षटकाचा खेळ बाकी असताना तो एक उंच फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला आणि आफ्रिकन संघाच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या. त्यामुळेच आफ्रिकन संघाचा डाव केवळ 212 धावांत गारद झाला. मिलरने सर्वाधिक 101 तर क्लासेनने 47 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियन संघाकडून कर्णधार पॅट कमिन्स आणि स्टार्क यांनी अतिशय भेदक गोलंदाजी करत प्रत्येकी 3 तर हेजलवूड आणि हेड यांनी त्यांना उत्तम साथ देत प्रत्येकी दोन गडी बाद केले.

ऑस्ट्रेलियन संघांची बलाढ्य फलंदाजी बघता हे आव्हान तसे माफकच वाटत होते पण आफ्रिकन गोलंदाज आपल्या संघाला सनसनाटी सुरवात करुन देवून काही चमत्कार करणार का आफ्रिका चोकर्स या नकोशा मानहानीकारक  उपाधीला सार्थ ठरवणार याच उत्सुकतेने सामना बघणाऱ्या चतुर क्रिकेट रसिकांना ऑस्ट्रेलियन सलामी जोडीने अतिशय धडाकेबाज सुरवात करून देताना अगदी काही क्षणातच काय होणार याचा अंदाज दिला.

वॉर्नर आणि हेड जोडीने पहिल्या 6 षटकांत तडाखेबंद फलंदाजी करत 60 वेगवान धावा जोडत आफ्रिकन संघाला आणखीच दडपणाखाली आणले. ही जोडीच आफ्रिकन संघाला पुरुन उरते की काय, असे वाटत असतानाच मार्करमने वॉर्नरला वैयक्तिक 29 धावांवर असताना त्रिफळा बाद करुन आफ्रिका संघांच्या गोटात थोडा तरी आनंद दिला.

वॉर्नरने 4 षटकार आणि 2 चौकार मारत केवळ 18चेंडूत यक धावा चोपून काढल्या.पुढच्याच षटकात रबाडाने मिशेल मार्शला आल्यापावली परत पाठवून आणखी एक यश मिळवून दिले. दुसऱ्या बाजूने ट्रेविस हेड आपल्या नैसर्गिक अंदाजात खेळत होता. सुदैवाने त्याला नशिबाची साथही मिळाली. आफ्रिकन संघाने आज काही झेलही सोडले. भले ते अवघड होते, पण दैवाने दिलेल्या छोट्या संधीचेही सोने ज्याला करता येते तोच बाजी मारतो, हेच खरे. बघता-बघता हेडने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो पूर्ण भरात आलाय असे वाटत असतानाच केशव महाराजने त्याला एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचित करुन संघाला मोठे यश मिळवून दिले. हेडने 48 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकार मारत तुफानी वेगात 62 धावा करुन संघाला अपेक्षित अशीच पण शानदार सुरुवात करुन दिली.

यानंतरही ऑस्ट्रेलियन संघ कोठेही अडचणीत आहे असे वाटत नव्हते, काही तरी चमत्कार होईल असे भलेही मनाला वाटत होते आणि तसेच वाटत होते आफ्रिकन गोलंदाजांना, म्हणूनच त्यांनी अतिशय जिद्दीने जबरदस्त गोलंदाजी टाकत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना एकेक धावेसाठी संघर्ष करायला लावला, पण त्यांच्या दुर्दैवाने संघाने धावा पुरेशा केल्या नव्हत्या.

शमसी, कोईटझे यांनी शानदार गोलंदाजी करत धुरंधर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना घाम गाळायला लावला. एकवेळ 7 फलंदाज बाद झाल्यानंतर आफ्रिका संघ चमत्कार करेल, असे वाटत होते, पण कर्णधार कमिन्स आणि स्टार्कने शानदार फलंदाजी करत संघाला विजयी करत आफ्रिकन संघाला पुन्हा एकदा निराश केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.