World Cup 2023 : चमत्कार होणार का आफ्रिका पुन्हा चोकर्सच ठरणार? ऑस्ट्रेलियन संघापुढे 213 धावांचे माफक लक्ष्य

एमपीसी न्यूज : (विवेक दि. कुलकर्णी)संपूर्ण क्रिकेटविश्वात चोकर्स म्हणून (World Cup 2023) ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाचा डाव आजच्या महत्वपूर्ण अशा उपांत्यफेरीच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध आपल्या निर्धारित 50 षटकात अतिशय खराब खेळ करत केवळ 213 धावांचे माफक आव्हान उभे केले आहे. फलंदाजांनी केलेल्या चुका गोलंदाज तरी टाळतील का आणि काहीतरी चमत्कार करतील का हे बघणे औत्सुक्याचे असेल.

विश्वकप 2023 ची स्पर्धा आता समारोपाच्या पर्वाकडे चालली आहे. यजमान भारतीय संघाने सुरुवातीपासूनच या स्पर्धेत आपल्या धडाकेबाज खेळाने प्रस्थापित केलेले वर्चस्व कायम ठेवत काल न्यूझीलंड संघाला 70 धावांनी पराभूत करत अंतिम सामन्यात आपली जागा पक्की केलेली आहेच. त्यांच्याविरुद्ध 19 नोव्हेंबरला अहमदाबाद येथे कोण लढणार? या प्रश्नाचे उत्तर आज रात्री दहाच्या आसपास सर्वाना मिळणार असे अपेक्षित होते. पण, कदाचित त्याच्याही आधी या प्रश्नाचे उत्तर ऑस्ट्रेलिया असेच असेल असे आता तरी वाटत आहे.

सिटी ऑफ जॉय म्हणजेच कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर आज विश्व कप 2023चा दुसरा उपांत्य फेरीचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघात खेळला जात आहे. ज्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांच्या डावाची सुरवात अतिशय खराब अशी झाली.

डावाच्या पहिल्याच षटकात त्यांच्या कर्णधार टेम्बा बवूमाने मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर इंग्लिसच्या हातात झेल देवून तंबूचा रस्ता धरला. बाऊमाला या संपूर्ण स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. आजच्या महत्वाच्या सामन्यात तर तो (World Cup 2023) भोपळाही फोडू शकला नाही. जहाज संकटात सापडल्यावर कॅप्टनने अखेरच्या श्वासापर्यंत लढायचे असते असे म्हणतात.

पण, बवूमाने कदाचित ती गोष्ट वाचलीच नसावी. या धक्क्यातून सावरण्याआधीच त्यांचा या विश्वकप स्पर्धेतला सर्वात यशस्वी खेळाडू डीकॉकही आपल्या कर्णधाराच्या वाटेने मार्गस्थ झाला. अन दक आफ्रिका चोकर्स म्हणून का ओळखली जाते याचे अस्सल उदाहरण पुढील काहीच वेळात डोळ्यासमोर साक्षात उभे राहिले. 1 बाद 1, 2 बाद 8 ते 4 बाद 24 अशी केविलवाणी अवस्था त्यांची झाली आणि ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीत शानदाररित्या पोहचणार असे खात्रीपूर्वक वाटू लागले.

क्रिकेटला नेहमीच अनिश्चितता असलेला खेळ म्हटले जाते. यात कधीही शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोवर काहीच सांगू नये असेही नेहमी म्हटले जाते. पण यात कदाचित आता असेही म्हटले जाईल. महत्वाच्या वा नॉक आऊट सामन्याचा निकाल तुमच्याच बाजूने लागेल जर का तुम्ही दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध लढणार असाल.

4 बाद 24 या कठीण परिस्थितीत दक्षिण आफ्रिका संघ सापडलेला असताना डेविड मिलर आणि हेन्रीक क्लासेन ही सर्वात अनुभवी जोडी मैदानात घट्ट पाय रोवून उभी राहिली. अन हळूहळू परिस्थिती समजून घेत त्यांनी सावधगिरी बाळगत डाव सावरायला सुरुवात केली.

क्लासेन हा या फॉरमॅट मधला सर्वांत खतरनाक खेळाडू मानला जातो. त्याला योग्य वेळी सूर गवसतोय असे वाटत असतानाच ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्सने ट्रेविस हेडला गोलंदाजीला आणण्याचा जुगार खेळला आणि हेडने जम बसत असलेल्या (World Cup 2023) क्लासेनची 47 धावांची छोटी पण महत्वपूर्ण खेळी संपुष्टात आणून कर्णधार कमिन्सने जुगार नाही तर योग्य खेळी केली हेच सिद्ध करत आफ्रिका संघाला पुन्हा एक मोठा धक्का दिला.

अन पुढच्याच चेंडूवर यांसेंनला आल्या पावली परत पाठवून 4 बाद 119 वरुन आफ्रिका संघाची अवस्था 6 बाद 119 अशी केली. यावेळी दक्षिण आफ्रिका संघ पुरता अडचणीत दिसत होता अन त्यांच्यासाठी रक्षक /तारणहार एकच उरला होता तो म्हणजे एकदिवसीय क्रिकेट सामन्यातला किलर म्हणून ओळखला जाणार मिलर.

आज मात्र मिलरला आपल्या लौकिकाला बाजूला ठेवून प्रगल्भ खेळी करण्यातच संघहित आहे. हे प्रकर्षाने जाणवले आणि पटलेही. त्याने खरोखरच आपल्या धडाकेबाज प्रतिमेच्या विरुद्ध पण अतिशय महत्वपूर्ण खेळी करून डाव सावरायला सुरुवात केली. बघताबघता त्याने आपले 25 वे अर्धशतक पूर्ण करुन “मै हु ना” असेच संघ नायक आणि व्यवस्थापन यांना सांगितले.

त्याला गेराल्डने पण चांगली साथ देत आफ्रिकन डावतली दुसरी अर्धशतकी भागीदारी नोंदवली. ही जोडी संघाला बऱ्यापैकी सन्मानजनक धावसंख्या गाठून देईल असे वाटत असतानाच कमिन्सने गेराल्डला एका उत्तम चेंडूवर चकवत ही भागीदारी तोडली. ऑस्ट्रेलियन संघ बऱ्यापैकी आघाडीवर असे वाटत होते, पण आफ्रिकन संघासाठी सारे काही संपले नव्हते.

PCMC : उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप

डेविड मिलर अजूनही मैदानात होता आणि तो एकहाती किल्ला लढवतही होता.आणि त्याने या अतिशय महत्वाच्या सामन्यात शब्दशः एकाकी लढत देत खतरनाक/भेदक अशा ऑस्ट्रेलियन पेस बॅटरी समोर जबरदस्त खेळ करत आपले या विश्वक स्पर्धेतले पहिले शतक पूर्ण करत संघाला सावरण्यात खूप मोठा वाटा उचलला.

त्याला दुसऱ्या बाजूने फारशी साथ मिळाली नसल्यानेच आफ्रिकन संघ आजच्या या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघापुढे (World Cup 2023) फारसे आव्हान उभे करूच शकला नाही. शेवटच्या दोन षटकाचा खेळ बाकी असताना तो एक उंच फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला आणि आफ्रिकन संघाच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या. त्यामुळेच आफ्रिकन संघाचा डाव केवळ 212 धावांत गारद झाला. मिलरने सर्वाधिक 101 तर क्लासेनने 47 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियन संघाकडून कर्णधार पॅट कमिन्स आणि स्टार्क यांनी अतिशय भेदक गोलंदाजी करत प्रत्येकी 3 तर हेजलवूड आणि हेड यांनी त्यांना उत्तम साथ देत प्रत्येकी दोन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियन संघांची बलाढ्य फलंदाजी बघता हे आव्हान तसे माफकच वाटत आहे. पण, आफ्रिकन गोलदाज आपल्या संघाला सनसनाटी सुरुवात करुन देवून काही चमत्कार करणार की ऑस्ट्रेलियन संघ विक्रमी जेतेपदाच्या लढतीत दिमाखात दाखल होईल याचा निकाल पुढील तीन तासाच्या आतच सर्वाना कळेलच, पण तोवर तुम्हाला काय वाटते? चमत्कार होणार का आफ्रिका चोकर्स या नकोशा मानहानीकारक कारक उपाधीला सार्थ ठरवणार?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.