Chichwad : खड्डेयुक्त रस्त्यावर युवासेनेचे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 आणि 11 मध्ये महापालिका प्रशासनाने रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ठ दर्जाची केली आहेत. अशा खड्डेयुक्त रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांना विनाकारण आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे युवासेनेच्या वतीने रस्त्यांवरील खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून महापालिका प्रशासनाविरोधात निषेधात्मक आंदोलन केले. 

भोसरी विधानसभेचे युवासेना प्रमुख सचिन सानप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी उपविभाग प्रमुख सोमनाथ सूर्यवंशी, चिटणीस अमित शिंदे, निखिल काटे, सतीश निकम, केतन बालगुडे, मोहन निकुंभ, मोहन मांडोळे, मिलिंद महाले, बाळू सूर्यवंशी, शैलेश पवार, राकेश सानप, निखिल भालेराव, प्रतिक चौधरी, अक्षय लोखंडे आदी उपस्थित होते. 

पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व गटारी, नाले यांची स्वच्छता करणे तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम करणे आवश्यक आहे. मात्र महापालिका प्रशासनाने रस्त्यांचे काम व्यवस्थित केले नाही. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे अजूनही तसेच आहेत. शुक्रवारी (दि. 6) एक महिला दुचाकीवरून जात असताना रस्त्यांवर पडलेले खड्डे चुकविताना तिचा तोल गेला आणि ती रस्त्यावर पडली. त्याचवेळी तिच्या दुचाकीच्या मागून आलेल्या पीएमपीएमएल बसच्या मागच्या चाकाखाली येऊन तिचा मृत्यू झाला. रस्त्यांवरील खड्ड्यांनीच या महिलेचा बळी घेतला आहे. या घटनेनंतर तरी महापालिका प्रशासनाचे डोळे उघडणार का, असा सवाल युवासेना प्रमुख सचिन सानप यांनी आंदोलनावेळी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.