लक्ष्मणभाऊ व महेशदादा यांच्यात मंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच!

मावळातून आमदार बाळा भेगडेही प्रबळ दावेदार! 

53 नगरसेवक निवडून आणल्याचा जगताप समर्थकांचा दावा

भोसरी मतदारसंघातून 33 नगरसेवक निवडून आणल्याचा लांडगेंचा दावा


एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला उध्वस्त केल्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. मंत्रिपदासाठी त्यांच्यात रस्सीखेच सुरू झाल्याने पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये गटबाजीला खतपाणी मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. मावळातून भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे हे मंत्रिपदाच्या प्रतीक्षा यादीतील प्रबळ दावेदार आहेत. आमदार जगताप आणि लांडगे यांच्या वादात भाजपचे निष्ठावान आणि जुने कार्यकर्ते म्हणून भेगडे यांच्या नावाचाही मंत्रिपदासाठी विचार केला जावू शकतो. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेवरील राष्ट्रवादीची एकहाती सत्ता भाजपने उलथवून लावली आहे. 77 जागा जिंकत प्रथमच महापालिकेवर ‘कमळ’ फुलविले आहे. पिंपरी महापालिकेवर सत्ता आल्यानंतर शहराला लाल दिवा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तसेच जो जास्त नगरसेवक निवडून आणेल त्या आमदाराला मंत्रिपद दिले जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले होते. त्यामुळे पिंपरी महापालिकेवर सत्तांतर झाल्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यात मंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. 

आमदार लक्ष्मण जगताप यांनी 55 नगरसेवक निवडून आणले आहेत. चार अपक्ष नगरसेवकांनीही भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एकूण 59 नगरसेवक आमदार जगताप यांचे समर्थक असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. त्यामुळे  ‘भाऊं’नाच लाल दिवा मिळणार असे संदेश त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर फिरविले जात आहेत. 

आमदार महेश लांडगे यांनी भोसरी मतदारसंघातील 44 पैकी 34 म्हणजे सुमारे 85 टक्के जागा जिंकल्या असल्याचा दावा, त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील 84 पैकी 45 जागा आमदार लक्ष्मण जगताप आणि अन्य पदाधिका-यांनी मिळून काबीज केल्या असल्याचे आमदार लांडगे यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत. आकडेवारीचा विचार करता भाजपच्या विजयाचे शिल्पकार आमदार महेश लांडगे ठरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस मंत्रिपदासाठी आमदार लांडगे यांचा प्राधान्याने विचार करतील, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे.     

मंत्रिपदावरुन आमदार जगताप आणि लांडगे यांच्यात रस्सीखेच सुरु असतानाच मावळातून आमदार बाळा भेगडे देखील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. भाजप सरकार सत्तेवर आल्यावर पुणे जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी आमदार बाळा भेगडे यांचे नाव आघाडीवर होते, मात्र शिवसेनेने पाठिंबा दिल्यामुळे ऐनवेळी शिवसेनेच्या मंत्र्यांना स्थान देताना आमदार भेगडे यांची संधी थोडक्यात हुकली होती. मंत्रिमंडळाच्या दुस-या विस्तारात भेगडे यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. पंरतु, युतीच्या राजकीय गणितामुळे पुन्हा मागे पडले होते. ती संधी त्यांना यावेळी मिळू शकते.

भेगडे यांनी पुणे जिल्ह्यातील लोणावळा, तळेगाव, आळंदी नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकवला. मावळ पंचायत समितीवरही भाजपचा झेंडा कायम ठेवण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी त्यांचीही दावेदारी वाढली आहे. आमदार जगताप आणि लांडगे यांच्या वादात भाजपचे निष्ठावान आणि जुने म्हणून भेगडे यांच्या नावाचा मंत्रिपदासाठी विचार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.