छोटा राजन टोळीचा गुंड स्वप्नील कुलकर्णी याला मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक

सहकारनगर पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – सहकारनगर पोलिसांनी आज केलेल्या कारवाईत छोटा राजन टोळीचा नामचीन गुंड स्वप्नील सुनील कुलकर्णी (वय -27, रा. बालाजीनगर, धनकवडी, पुणे) याला मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक केली आहे. पुण्यातील बालाजीनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.

यावेळी त्याच्या ताब्यातून एक कार्बाइन, तीन देशी पिस्तुल आणि 21 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या शस्त्राचा वापर तो एका व्यक्तीच्या हत्येसाठी करणार होता, असे तपासादरम्यान उघड झाले आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पोलीस नाईक संजय भापकर यांना स्वप्नील हा बालाजीनगर परिसरात शस्त्रसाठ्यासह येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. तो 2010 पासून छोटा राजन टोळीशी संबंधित असून त्याच्यावर पुणे शहरात खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी करणे, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुंबई पुण्यासह ती इतरही काही शहरात छोटा राजन टोळीसाठी काम करायचा. आज जप्त केलेला शस्त्रसाठा त्याला एका व्यक्तीने नाशिकमध्ये दिला. त्याने तो मध्यप्रदेशातून आणल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

यातील धक्कादायक माहिती म्हणजे आरोपीकडून जप्त केलेली 21 जिवंत काडतुसे ही खडकी येथील अॅम्युनेशन फॅक्टरीतील आहेत. ती त्याला कशी मिळाली याचा तपास सुरू आहे. 2012 मध्ये त्याने शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात एकावर गोळीबार केला होता. 2015 मध्ये एका गुन्ह्यात त्याला अटकही करण्यात आली होती.

सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.