जनसेवा विकास समितीच्या वतीने तळेगावमध्ये हंडामोर्चा

एमपीसी न्यूज – जनसेवा विकास समितीच्या वतीने तळेगाव स्टेशन परीसरातील नागरिकांना भेडसावणा-या पाणीप्रश्नावरून तळेगाव नगरपरिषदेपर्यंत हंडामोर्चा काढण्यात आला. 

हा मोर्चा विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सुलोचना आवारे, नगरसेवक संग्राम काकडे, गणेश खांडगे, सचिन टकले, रोहित लांघे, अनिता पवार, सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे मोर्चामध्ये सहभागी झाले होते. सुलोचना आवारे यांनी पाणीप्रश्नाबाबतचे लेखी निवेदन मुख्याधिकारी वैभव आवारे यांना दिले.

यावेळी नगरपरिषदेतील नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या कार्यालयासमोर माठ फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. मोर्चामध्ये 500 ते 700 नागरिक सहभागी झाले असून माठ आणि हंडा घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. स्टेशन परिसरामध्ये होत असलेला पाणीपुरवठा अपु-या दाबाने आणि अनियमितपणे होत असून त्यामध्ये वेळेचाही अभआव आहे, त्यामुळे नागरिकांना मोठा जाच सहन करावा लागत आहे. यासंबंधीत प्रश्न मांडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. 

यावेळी मान्यवरांनी प्रतिक्रीया व्यक्त करताना शहरातील प्रत्येक भागाला वेगवेगळ्या वेळेत पाणी सोडावे, पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जावा, पाण्याचे वेळापत्रक तयार करावे अशा मागण्या मांडण्यात आल्या.

तसेच नगराध्यक्षा चित्रा जगनाडे म्हणाल्या की, इंद्रायणी जॅकवेलचे काम सुरु आहे. ते योग्यरित्या सुरु झाल्यावर पाणीप्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे.

मुख्याधिकारी वैभव आवारे म्हणाले की, 8 मार्च महिला दिनापर्यंत महिलांचे प्रश्न सोडवण्यात येतील, तसेच पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार करण्यात येईल. प्रत्येक कॉलनीचे वेळापत्रक तयार करुन प्रसिद्ध केले जाईल. तसेच यावेळी प्रत्येक भागातील नागरिक प्रतिनिधी ठरवून यापुढे ते या प्रश्नाचा पाठपुरावा करतील असे ठरवण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.