केरळमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज –  केरळमध्ये कम्युनिस्टांकडून हिंदुत्ववादी संघटनेच्या आणि  भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात आहेत. केरळ सरकारचा हल्लेखोरांना पाठिंबा आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनरर्इ विजयन यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे केरळमधील कम्युनिस्टांचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी  मागणी मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी केली.

 

प्रबोधन मंचाच्या वतीने केरळमधील मार्क्सवाद्यांकडून सरकारच्या पाठिंब्याने चालवलेला पाशवी हिंसाचार आणि संघ, भाजप व विरोधी कार्यकर्त्यांचे होत असलेले नृशंस हत्याकांड याचा निषेध करण्यासाठी तळेगाव येथे ‘धिक्कार सभे’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार भेगडे बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. भास्कर भोसले, कार्यवाह अविनाश भेगडे, प्रमुख वक्ते प्रशांत दिवेकर, जिल्हा संघचालक सुरेश शहा, मावळ तालुका संघचालक विनोद मेहता, भाजप तळेगाव शहराध्यक्ष संतोष दाभाडे, कार्याध्यक्ष रवींद्र आवारे, देहूरोड भाजप शहराध्यक्ष कैलास पानसरे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभूळकर, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, माजी नगरसेवक गणेश भेगडे, चंद्रकांत शेटे, पंचायत समिती सदस्य गुलाब म्हाळसकर, संभाजी म्हाळसकर, बजरंग दलाचे पुणे जिल्हा संयोजक संदेश भेगडे, नगरसेवक अरुण भेगडे, अमोल शेटे उपस्थित होते. 

 

देशाला परमवैभवाला नेण्यासाठी राष्ट्रवादी विचार केरळमध्ये रुजविण्याचे काम संघ कार्यकर्ते अनेक वर्षापासून करत आहेत, असे सांगत प्रशांत दिवेकर म्हणाले कम्युनिस्टांकडून मात्र विचाराला विचाराने उत्तर न देता संघ कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ले केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून अभाविपला देशपातळीवर बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे.  साम्यवाद्यी विचारांचा जगभरातून आणि देशभरातून पराभव होत असताना, केरळमधील कम्युनिस्ट सरकार वैचारिक लढाई न लढता हिंसेवर उतरली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ही नुकतेच देशात असहिष्णुतेला थारा नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली असून ती लक्षात घेणे गरजेचे आहे. सरकारच्या पाठिंब्याने संघ कार्यकर्त्यांना आयुष्यातून उद्धवस्त करण्याचे काम केरळमध्ये केले जात आहे. त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, असेही दिवेकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.