लोणावळा शहरातील विविध प्रकल्पांसाठी साडेसात कोटीचा निधी मंजूर

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरातील विविध प्रकल्पांसाठी डीपीडीसी व महाराष्ट्र शासनाच्या विशेष अनुदानामधून साडेसात कोटींचा निधी देण्यात आला असल्याची माहिती मावळचे आमदार संजय तथा बाळा भेगडे यांनी दिली.

आमदार भेगडे यांनी आज लोणावळा नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचा व प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी नगरपरिषद सभागृहात आढावा बैठक घेतली. बैठकीला मावळचे प्रांत अधिकारी सुभाष भागडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, काँग्रेस आयचे प्रांतिक सदस्य दत्तात्रय गवळी, भाजपचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, काँग्रेस आयचे शहराध्यक्ष नारायण आंबेकर यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका आदी उपस्थित होते.

लोणावळा शहरातील जुना खंडाळा व गोल्ड व्हॅली परिसरातील रस्ते बनविण्यासाठी डीपीडीसीच्या फंडातून 5 कोटी रुपये नगरपरिषदेला देण्यात आले आहेत. तसेच कैलासनगर स्मशानभूमीसाठी 75 लाख व भांगरवाडी पुलाच्या कामासाठी 75 लाख रुपये, नांगरगाव येथील श्री स्वामी समर्थ भवन ते विज वितरण कार्यालय रस्त्यांकरिता 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याचे भेगडे यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी लोणावळा नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या कामाची पाहणी केली. शहरातील रस्ते व वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काय उपाययोजना करणे शक्य आहे, याची माहिती घेतली. हनुमान टेकडी येथील रिंगरोडचा प्रश्न, भांगरवाडीची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी भारत सॉ मिल ते हनुमान टेकडी व पुढे ओळकाईवाडी हा रस्ता बनविण्याचा प्रस्ताव, शहरातील सर्व स्मशानभूमीचा प्रश्न याबाबत माहिती घेऊन प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना नगरपरिषदेला दिल्या.

 

 

तसेच या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी नगरसेवकांच्या कमिट्या तयार करा, असा सल्ला दिला. दर आठवड्याच्या शुक्रवारी 1 तास लोणावळा नगरपरिषदेला देणार असल्याचे यावेळी आमदार भेगडे यांनी सांगितले. लोणावळा शहरातील एफएसआय वाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्याबाबत आमदारांनी पाठपुरावा करावा, रेल्वे विभागातील परवानग्यांचे प्रश्न सोडवावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच नगरपरिषदेच्या भाडेकराराच्या मिळकतींना 100 वर्ष झाले आहे. याबाबत शासनस्तरावर धोरण ठरविण्यात यावे याबाबत चर्चा झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.