गायक आदर्श शिंदे यांच्या नावाच्या बनावट फेसबूक प्रोफाईलद्वारे महिलेची फसवणूक

एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – गायक आदर्श शिंदे यांच्या नावाने बनावट फेसबूक प्रोफाईल तयार करून त्याआधारे मराठी फिल्म इंडस्ट्रीत काम मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी उत्कर्ष आनंद शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै 2016 पासून घडत होता.

संतोष उजागरे, असे आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा मुलगा आदर्श शिंदे याच्या नावाने आरोपी संतोष उजागरे याने फेसबुकवर बनावट प्रोफाइल तयार करून संबंधीत महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर माझ्या ओळखीने मराठी फिल्म इंडस्ट्रीत काम लावून देतो, असे सांगत तिच्याकडे 10 हजार रुपयाची मागणी केली. बँक ऑफ महाराष्ट्राच्या अंबाजोगई शाखेत हे पैसे भरण्यास सांगितले. पैसे घेतल्यानंतरसुद्धा संबंधित महिलेला काम लावून न देता तिची फसवणूक केली.

त्यामुळे फिर्यादींनी त्यांची व आदर्श शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी संतोष उजागरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविषयी अधिक माहिती मिळाली नसून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस. व्ही. आवताडे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.