व्यवसाय वृद्धीसाठी महिला उद्योजिकांनी एकत्र यावे – सुर्यकांत पाठक

महिला उद्योजिकांसाठी विविध वस्तूंच्या तीन दिवसीय मोफत प्रदर्शनाचे आयोजन

एमपीसी न्यूज – आज प्रत्येकजण गलेलठ्ठ वेतन असणा-या नोकरीच्या मागे धावताना दिसत आहेत. आर्थिक स्थिरता आणि सुरक्षितता हे त्या मागील महत्त्वाचे कारण असते. परंतु व्यवसाय करण्यामुळे जो आर्थिक लाभ आणि समाधान मिळते, ते नोकरीमध्ये मिळत नाही. अनेक महिला विविध कौशल्य वापरुन अतिशय चांगल्या पद्धतीच्या वस्तूंचे उत्पादन करतात. परंतु विक्रीसाठी योग्य व्यासपीठ न मिळाल्याने त्या मागे राहतात. अशावेळी व्यवसाय वृद्धीकरीता महिला उद्योजिकांनी एकत्र येऊन विकासाच्या दिशेने वाटचाल करावी, असे मत ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सुर्यकांत पाठक यांनी व्यक्त केले.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक, पुणे केंद्र, महिला आघाडीतर्फे महिला उद्योजिकांसाठी आयोजित विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन पाठक यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, केंद्रप्रमुख प्रकाश दाते, संस्थेचे कार्यवाह विश्वनाथ भालेराव, महिला आघाडी प्रमुख सरिता काळे, संस्थेच्या उपाध्यक्षा सुजाता मवाळ, शैला गिजरे, अपर्णा मोडक, सुवर्णा रिसबुड, यशश्री पुणेकर, अनघा जोशी आदी यावेळी उपस्थित होते. प्रदर्शनात 20 पेक्षा अधिक स्टॉल्सचा समावेश आहे.

सुर्यकांत पाठक म्हणाले, महाराष्ट्रात बाहेरील लोक व्यवसाय करण्यासाठी येतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते व्यवसाय करतात. महाराष्ट्रातील लोक कष्ट करण्यास कमी पडतात. परंतु यातून बाहेर पडल्यास मराठी माणसाच्या व्यवसायाला चांगले दिवस येतील, असेही त्यांनी सांगितले.

मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या, महिला देखील अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवसाय करु शकतात. त्यांना केवळ प्रोत्साहन देण्याची गरज असते. त्यांच्यामध्ये कौशल्य आणि नाविण्य असते. योग्य दिशा आणि पाठबळ मिळाल्यास त्या नक्कीच पुढे जातील. महिलांनी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी व्यवसायाचा मार्ग निवडावा, असेही त्यांनी सांगितले.

महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी रविवार, दि. 19 मार्च पर्यंत सकाळी 9 ते रात्री 8 यावेळेत केसरी वाड्यासमोरील गुप्ते मंगल कार्यालय येथे विविध वस्तूंच्या विनामूल्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.