अमित गावडे व्यवसायातून राजकारणाकडे वाटचाल करणारे एक नवे नेतृत्व

एमपीसी न्यूज – बांधकाम व्यवसाय, हॉटेल व्यवसाय या व्यवसायातून राजकारणात आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवक अमित गावडे यांच्यामुळे निगडी परिसराला एक नवीन नेतृत्व मिळाले आहे. समाजकार्याची आवड असलेले अमित गावडे प्रभाग क्रमांक 15 निगडी प्राधिकरणमधून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले आहेत.

अमित गावडे हे 2008 पासून बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. त्यानंतर व्यवसायवृद्धी करत त्यांनी हॉटेल व्यवसायालाही सुरुवात केली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना  या व्यवसायामधून वेळ काढत समाजकार्याची आवड जोपासत त्यांनी विविध उपक्रम हाती घेतले.

याविषयी एमपीसी न्यूजशी संवाद साधताना अमित गावडे म्हणाले की, मागील आठ-दहा वर्षांपासून दुर्गेश्वर मित्रमंडळ आणि श्री समर्थ युवा मंचच्या वतीने आम्ही अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले. यामधून कायम जनसंपर्क वाढत राहिला. तसेच या सर्व उपक्रमांमध्ये कोणत्याही बड्या नेतेमंडळीची नाही तर मित्रमंडळी आणि त्यांच्या परिवाराने साथ दिली, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

व्यावसायिक असण्याबरोबरच त्यांचे वैशिष्ट म्हणजे ते एक उत्तम कबड्डीपट्टूही होते. आज जरी ते खेळत नसले तरी ज्ञान प्रबोधिनीमधून शालेय शिक्षण जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन त्यांनी अनेक सांघिक आणि वैयक्तिक बक्षिसेही पटकावली आहेत.

तसेच पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सभागृहातील अनुभवाबद्दल गावडे म्हणाले की, आतापर्यंत मित्रमंडळींच्या साथीने अनेक उपक्रम राबवले. मात्र, तरीही सभागृहात गेल्यानंतर जनतेचा प्रतिनिधी म्हणून वाढलेल्या जबाबदारींची ख-या अर्थाने जाणीव झाल्याचे त्यांनी सांगितले.

परिसरात घडणा-या गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण निगडी प्रधिकरणामध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याकडे प्राधान्याने लक्ष देणार आहे. सध्या महिलांच्या सोनसाखळी पळवल्याच्या घटना जरी कमी झाल्या असल्या तरी वारंवार घडत आहेत. त्या थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असून दुरावस्थेत असलेल्या महापालिकेच्या दवाखान्यांची दुरुस्ती करणार असल्याचेही अमित गावडे यांनी सांगितले.
"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.