संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात बळीराजा संकटात – शरद पवार

एमपीसी न्यूज – संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात बळीराजा जास्त संकटात आहे. त्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्वांनी हातभार लावला पाहिजे. ग्राहकांनी सुद्धा त्याच्या हिताची जपणूक केली पाहिजे. त्याच्या दुःखावर फुंकर घातली पाहिजे. सरकार यावर शहाणपणाने निर्णय घेईल आणि बळीराजाच्या अडचणी दूर होऊन बळीचे राज्य येईल अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली. 

 

महिला आरक्षणाला 25 वर्ष पूर्ण होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, महापौर मुक्ता टिळक, खासदार सुप्रिया सुळे, माजी केंद्रिय सचिव राधा सिंग, खासदार रजनी पाटील, राष्ट्रवादीच्या शहरअध्यक्ष वंदना चव्हाण, पुणे महापालिकेचे गटनेते चेतन तुपे, काँग्रेसचे शहरअध्यक्ष रमेश बागवे, संजोग वाघेरे, मंगला कदम आणि काँग्रेसच्या नगरसेविका उपस्थित होते.

 

पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. हा विषय चिंतेचा आहे. गेल्या तीन वर्षात 12 हजार शेतकरी दरवर्षी आत्महत्या करतात. त्या कुटुंबाची अवस्था काय होत असेल. सरकारने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे, त्यांना सन्मानाने जगण्यासाठी सरकरसोबतच जनतेनेही पुढाकार घेतला पाहिजे असे ते म्हणाले.

 

नागालँड सारख्या राज्यात 99 टक्के साक्षरता आहे आणि फुलेंच्या महाराष्ट्रात 80 टक्के आहे. याविषयी जाणून घेतले असता तेथील सर्व प्रमुख कामे महिलांच्या हातात आहेत. त्यामुळे त्याठिकाणी साक्षरता असल्याचे जाणवले. महिलांना माहित असत की हवंय आणि काय नाही.

सरंक्षण खात्यात असताना महिलांना लष्करात घेण्याचा विषय 3 महिने मांडत होतो. त्यानंतर मी चर्चा बंद केली आणि तीनही दलात महिलांना प्रवेस देण्याचा निर्णय मी घेतला. जगाच्या तुलनेत हवाई दलात भारतात अधिक अपघात होत होते. परंतु महिलांच्या हवाई दलातील प्रवेशानंतर हे अपघात कमी झाले असे मला हवाई प्रमुखांनी सांगितले. दिलेलं काम बारकाईने करण्याची दृष्टी महिलांची असते, तर दिलेलं काम सोडून दुसरीकडे लक्ष देणे ही पुरुषांची सवय असते.

 

"jahirat"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.