निसर्गरम्य जंगल, विविध प्राणी आणि पक्षी यांनी समृद्ध बांधवगड जंगल

एमपीसी न्यूज – जबलपूर पासून 180 कि.मी. अंतरावर मध्यप्रदेशमध्ये असलेले बांधवगड हे निसर्गरम्य जंगल विविध प्राणी आणि पक्षी यांनी समृद्ध आहे. या जंगलातल्या सफारीचा आनंद काही वेगळाच आहे. बांधवगड जंगल पाहायला जाणे म्हणजे पशु, पक्षी आणि झाडे पाहायला जाणे नाही. तर जंगलात राहणा-या प्राण्यांना, हळूच इकडून-तिकडे पाळणा-या पक्ष्यांना, दुडूदुडू धावणा-या ससा, खारुताई यांचे नैसर्गिक आयुष्य समजून घेण्याच्या मोठा अनुभव आहे. 
 
फ्रेंड्स ऑफ नेचर्स या संस्थेने जंगल वाचण्याची, विविध पशु पक्ष्यांविषयीच्या आपल्या ज्ञानात भर घालणारी सुंदर अनुभूती 84 निसर्गप्रेमी बांधवांना करून दिली. वातानुकुलीत राहण्याची व खानपानाची सुंदर व्यवस्था, जंगल सफारीसाठी मारुती जिप्सी, जाताना येताना रेल्वेचा आणि रेल्वे स्टेशन पासून जंगलातील हॉटेल पर्यंतचा वातानुकुलीत प्रवासात 45 अंश तपमानाच्या झळा जाणवतच नाहीत. 
 
पहिल्या दिवशी जबलपूरचा बेडाघाटचा धुंवाधार धबधबा आणि संगमरवरी डोंगरातून नर्मदेच्या निळ्याशार पाण्यातील बोटींगचा आल्हाददायक अनुभव मिळविता येतो. त्यानंतर पाण्यात डुंबणारी कनकट्टी वाघीण आणि बागडणारे तिचे बछडे, स्पॉटी आणि तिचे बछडे, बामेराजसन, हिम्मंत सिंग अशा नावांची वाघाची पिल्ले पाहता येतात. सफारीदरम्यान कुणाला 4 वेळा वाघाचे दर्शन होते, तर कुणाला तब्बल 9 वेळा. 

 
सगळ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य असते वाघाबरोबरच अस्वल, रान डुक्कर, गवे, जंगली कुत्रे, कोल्हे, हत्ती (वनखात्याने पाळलेला), विवध प्रकारची हरणे, सांबर, नीलगाय, कासव असे विविध प्राणी त्यांच्या मुक्त अवस्थेत पाहायला मिळतात. याच जंगलात झाडांच्या उंच टोकावर बसून वरची हिरवी पाने खाली हरीणांच्या कळपांसाठी टाकणारी माकडे असंवेदनशीलतेचा कळस चढलेल्या माणसांपुढे मानवतेचा आदर्श देताना दिसतात. त्याच्या या कृत्याला ‘मानवता’ तरी कशी म्हणता येईल ती तर ‘प्राणवता’च ठरेल. पिसारा फुलवून नाचणारे मोर, विविध पक्षी, हरिणांची तुरु तुरु पळण्याची लगबग सगळं कसं डोळे तृप्त करणारे दृश्य दिसते. 
 
जंगल सफारीत सकाळी 6 ते 9:30 व दुपारी 3:30 ते 6:30 अश्या दोन सफारी असतात. एका मारुती जिप्सी मध्ये 6 जणांचा समूह असतो. बरोबर जिप्सीचा ड्रायव्हर आणि गाईड पण असतात. मात्र आपल्याला जंगलात गाडीतून खाली उतरण्याची परवानगी नसते. सहसा आपल्याला नेहमी पाहायला न मिळणारे पाणकावळा, पिंगळा, सर्पंट इगल, व्हाईट आय इगल, ट्रीपॉय, घुबड, गिधाडे यांसारखे विविध पक्षीही पाहायला मिळतात. 
 
फ्रेंड्स ऑफ नेचर्स असोसिएशन सारख्या संस्था अशा प्रकारच्या सफारीचे आयोजन करतात. ही संस्था वर्षातून 3-4 जंगल सफारी, 25-30 गिर्यारोहक सहली व 2 केनिया सफारीचे आयोजन करते. यामधून लोकांना निसर्गाच्या जवळ घेऊन जाऊन त्यांना नैसर्गिक जगण्याचा आनंद मिळवून देणे हा एकमेव उद्देश असतो. या जंगल सफरीवरून येताना सफारीसाठी गेलेली मंडळी मानवी वसाहतीत प्राणवतेचा वसा एकमेकांना देतील ही त्यामागची दूरदृष्टी असते. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.