छत्रपतींच्या मार्गावर चालण्याची संधी – ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ ट्रेक

(विश्वास रिसबूड)

एमपीएसी न्यूज- नेहमी थोर व्यक्तींच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे असे सांगितले जाते. पन्हाळगड ते पावनखिंड या चित्तथरारक ट्रेकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांची धूळ ज्या मार्गावर अजूनही सुगंध देत आहे त्याच मार्गावरून प्रत्यक्ष छत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याची संधी आपल्याला मिळणे यापेक्षा भाग्य ते काय असू शकते

पन्हाळगडाभोवती चार महिने तळ ठोकून बसलेल्या सिद्दी जोहरच्या पोलादी पकडीतून शिवाजी महाराजानी मोठ्या हिमतीने ऐन पावसाळ्यात, किर्रर्र अंधाऱ्या रात्री शत्रूला गाफील ठेवून पलायन केले. तो दिवस होता १३ जुलै १६६०. या मोहिमेत महाराजांचे दोन अत्यंत विश्वासू शिलेदार स्वराज्याच्या कामी  आले. एक शिवा  काशीद आणि दुसरे बाजीप्रभू देशपांडे. एवढा सगळा इतिहास सांगायचे कारण म्हणजे या दोन हुतात्म्यांच्या अखेरच्या प्रवासाची साक्ष देणारा हा ट्रेक आहे. या ट्रेकची सुरुवात शिवा काशीद यांच्या स्मृतिस्थळापासून होते तर शेवट बाजीप्रभूंच्या बलिदान स्थळापाशी होतो.

मध्यंतरी व्हाट्सअँप वर कोल्हापूरच्या प्रशांत साळुंखे यांच्या  ‘शिवराष्ट्र हायकर्सया संस्थेचे एक पत्रक वाचनात आले. या संस्थेतर्फे मागील २४ वर्षांपासून पावसाळ्यातपन्हाळगड ते पावनखिंड’ ट्रेक आयोजित केला जातो. या ट्रेकला जाण्याची माझी अनेक दिवसांपासून इच्छा होती. त्याप्रमाणे मी आणि माझा मित्र हेमंत धायबर कोल्हापूरला दाखल झालो. तेथून सकाळी वाजता पन्हाळगडाकडे कूच केले. या ठिकाणी विविध ट्रेकर्स ग्रुप दाखल झालेले होते. कुणी हा ट्रेक दोन दिवसात पूर्ण करणार होते तर कुणी रात्री या मार्गावरून जाणार होते. शिवराष्ट्र हायकर्स चा हा तीन दिवसांचा ट्रेक होता. आमच्या ग्रुपमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेले जवळपास ३७० जण होते.

पन्हाळगडावर शिवा काशीद यांच्या समाधीस्थळाची पूजा करून ट्रेकचा प्रारंभ झाला. या ठिकाणी डॉ. अमर आडके यांचेशिवा काशीद यांचे बलिदानया विषयावर व्याख्यान झाले. एकंदरीतच तो ऐतिहासिक प्रसंग ऐकून आम्हीफुल्ल टू चार्ज’ झालो. त्यानंतर काही कलाकारांनी बाजीप्रभूंच्या पुतळ्यासमोर चित्तथरारक मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली. आवश्यक त्या सूचना दिल्यानंतर अखेर दुपारी एक वाजता पन्हाळगडाच्या पश्चिमेला असणाऱ्या पुसाटीच्या बुरुजापासून आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली. महाराजांनी याच मार्गावरून पलायन केले होते. ट्रेकची सुरुवातच असल्यामुळेजय शिवाजी जय भवानी‘ ‘ छत्रपती शिवाजी महाराज की जयअशा घोषणा देत आमची पावले वेगाने मार्गक्रमण करीत होती. आम्ही सोबत फक्त पॅक लंच, खाण्याचे साहित्य आणि पाण्याची बाटली घेतली होती. बाकी आम्ही आणलेले सर्व सामान, ताटवाटी पेला, अंथरूण पांघरून ठेवण्यासाठी टेम्पोची सोय केली होती. मुक्कामाच्या ठिकाणी हे साहित्य आम्हाला मिळणार होते. आमचा पहिला मुक्काम १८ किमीवरील खोतवाडी येथे होता.

गड उतरल्यानंतर तुरुकवाडी मार्गे आम्ही म्हाळुंगेच्या दिशेने निघालो. कच्ची सडक संपल्यानंतर शेताच्या कडेकडेने डोंगराची चढण सुरु झाली. ढगाळ वातावरण असल्यामुळे उन्हाचा त्रास नव्हता. बरीच मोठी चढण चालून गेल्यानंतर तासाभरांत म्हाळुंगे गावात दाखल झालो. पंचवीस उंबऱ्यांची छोटीशी वाडी. या वाडीमधूनच महाराष्ट्रातील एका मोठ्या पठाराकडे रस्ता जातो.

म्हसाईचे पठार जवळपास 6-7 किमी लांबीचे आहे. काही ठिकाणी कातळ तर काही ठिकाणी गवत उगवलेल्या या पठाराच्या सभोवती क्षितिजापर्यंत नजर जाते. या पठारावर म्हसाई देवीचे एक छोटेसे मंदिर आहे. या ठिकाणी दसऱ्याला  मोठी यात्रा भरते. दुपारचे दोन वाजले होते. या पठारावरच्या सगळ्यांनी आपापली शिदोरी सोडली. जेवण झाल्यावर पुन्हा मार्गस्थ झालो. म्हसाईचे पठार ओलांडून डोंगरउतरणीला लागलो. आता पाय बोलायला लागले होते. १२ किमीचे अंतर पार केले होते. अजून ६-७ किमी चालणे होते. निलगिरीच्या झाडीतून निघालो. समोर एक छोटीशी वाडी दिसली. त्यामुळे आमची पावले वेगाने पडू लागली. पण ती मांगलाईवाडी होती. अजून ३ किमीची वाटचाल करायची होती. आमच्यापैकी बरेच जण वेगात पुढे निघून गेले होते. मी मात्र मुंगीच्या गतीने निघालो होतो. पाय ‘आता पुरे’ म्हणत होते. पण मनाचा उत्साह कमी होत नव्हता.

या रस्त्यावरून लांबवर निसर्गाचा एक चमत्कार पाहायला मिळाला. उंच डोंगरावर एकावर एक रचलेले अनेक दगड दिसले. लगोरी खेळायला एकावर एक दगड रचतात तसे. असे कितीतरी पाषाणस्तंभ होते. त्यातले काही पिसाच्या मनोऱ्यासारखे कललेले होते. तो सगळा डोंगरच पाषाणस्तंभांचा होता. मोबाइलवर फोटो काढण्याचा प्रयत्न केला. परंतु स्पष्ट आला नाही. तो चमत्कार पाहून पुन्हा खोतवाडीच्या दिशेने निघालो. संध्याकाळी सव्वासहा वाजता खोतवाडी येथे पोचलो. सर्व ट्रेकर्सची गावातील शेतकऱ्यांच्या घरात राहण्याची सोय करण्यात आली होती. आमचे इतर सामान असलेल्या  टेम्पोमधून आपापल्या वळकट्या घेतल्या.  गरमागरम चहा मिळाल्यामुळे सगळा शीण निघून गेला. थकलो असल्यामुळे जेवून झोपी गेलो.

"Panhala

"Panhala

दुसऱ्या दिवशीचा ट्रेक हा खऱ्या अर्थाने चालण्याची क्षमता अजमावणारा होता. आज आम्हाला २८ किमीचे अंतर पार करून पावनखिंडीपासून १० किमीवर असलेल्या पांढरेपाणी या गावात पोचायचे होते. सकाळी साडेआठ वाजता ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देऊन आम्ही मार्गस्थ झालो. प्रत्येकजण आपापल्या चालीने निघाले. त्यामुळे कुणी पुढे निघून गेला तर कुणी खूप मागे राहिला. कधी भाताच्या खाचरातून तर कधी दगड धोंड्यावरून चालत राहिलो. नुकताच पाऊस पडून गेलेला असल्यामुळे निसर्गाने हिरवी शाल पांघरलेली होते. त्यावर मधूनच ढगांच्या आडून सूर्यकिरणांचा स्पॉटलाईट पडला की सगळी हिरवाई पाचूसारखी चमकून उठे. वाटेतील छोटे छोटे ओहोळ पार करीत, एकमेकांना हात देत निघालो. अचानकपणे ऊन पडले आणि सप्तरंगी इंद्रधनुष्य उजळून आले. पण इथे इंद्रधनुष्याची कमान नव्हती तर एका ढगांवर सात रंग मुक्तपणे उधळून द्यावेत तसे पसरलेले होते. क्षणभरच हा चमत्कार दिसला. पुन्हा सूर्य ढगात गडप झाला.

कळकेवाडी, रंगेवाडी, माळेवाडी  अशा वाड्या पार करीत निघालो. पाटेवाडी येथे चहा घेतला. आता इथून पुढे घनदाट जंगलातून जायचे होते. मधूनच पावसाची हलकीशी सर येऊन जायची. शेतकरी भात लागवडीमध्ये गुंतलेला होता. गुडघाभर चिखलाच्या पाण्यात भातरोपे तरारून उठली होती. आम्हालाही त्या चिखलातून वाट काढत जाताना तोल सावरत जावे लागत होते. पाऊल उचलले की पायातला बूट चिखलात आणि पाय बाहेर अशी अवस्था होत होती. झाडाची छोटीशी फांदी, गवत याचा आधार घेत त्या चिखलातून बाहेर पडत होतो. डोंगराच्या घळीमधून पाण्याचे पाट वाहत असल्यामुळे चिखलाने बरबटलेले बूट पाण्यातून नेले की ते स्वच्छ होत असत. काही ठिकाणी इतकी घनदाट झाडी होती की वाटच दिसत नव्हती. पण रानवाटांची एक गम्मत असते. या वाटा आपल्याशी बोलत असतात. त्याच आपल्याला वाट दाखवत असतात. या जंगलात जळवा लागतात असे सांगण्यात आल्यामुळे प्रत्येकजण काळजी घेत होता. पण तसे काही आढळून आले नाही. डोंगराची चढउतार करून पाय अक्षरशः लटपटायला लागले होते. 

मजल दरमजल करीत एका धनगरवाडीत येऊन पोचलो. इथून तीन किमीवर डांबरी सडक लागल्यावर माझ्या जिवात जीव आला. माझ्यासोबतचे  सर्वजण पुढे निघून गेले होते. मी एकटाच वाट तुडवत निघालो. पाय प्रचंड दुखत होते. त्यामुळे हळू हळू चालत होतो. अखेर लांबवर वाहनांचे हॉर्न ऐकू यायला लागले. पुन्हा एक छोटीशी चढण पार करून मी रस्त्यावर आलो. डाव्या बाजूला तीन किमीवर पांढरेपाणी गावात संध्याकाळी सहा वाजता पोचलो.

सकाळी चहा नाश्ता झाल्यावर पावनखिंडीच्या दिशेने निघालो. येथून फक्त ६ किमीवर पावनखिंड आहे. पावसाळी वातावरण असल्यामुळे दाट धुके पसरलेले होते. मधूनच पावसाची हलकीशी सर येत होती. तासाभरात पावनखिंड येथे पोचलो. हाच रस्ता पुढे विशाळगडला जातो. पावनखिंड येथे आलो पण खिंड काही दिसत नव्हती. या ठिकाणी शासनाच्या वतीने सुशोभीकरण करण्यात आले आहे. एक बुरुजवजा दगडाचे बांधकाम करून त्यावर हिंदवी स्वराज्याचा ध्वज डौलाने फडकत आहे. या बुरुजाच्या मागच्या बाजूला पावनखिडीची लढाई ज्या ठिकाणी झाली तिकडे जाण्यासाठी उतारावर दगडी पायऱ्या करण्यात आल्या आहेत. पायऱ्या उतरून आम्ही पावनखिंडीच्या मुक्कामाला पोचलो. या ठिकाणी नरवीर बाजीप्रभू देशपांडे  आणि त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले होते. खिंडीत धबधब्याचे पाणी वाहत होते. उन्हाळ्याच्या दिवसात या खिंडीतून पुढे चार किमीपर्यंत जात येते. खिंडीत उतरण्यासाठी लोखंडी शिड्या करण्यात आल्या आहेत. आमच्यापैकी काही जणांनी शिडीवरून खिंडीत उतरून सेल्फीची हौस भागवून घेतली. वास्तविक अशा ठिकाणी मोहाचा एक क्षण तुमचे आयुष्य संपविण्यासाठी टपलेला असतो. अशा तऱ्हेने शिवा काशीद यांच्या समाधीपासून सुरु झालेला आमचा प्रवास बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदान स्थळी संपला.

या संपूर्ण ट्रेकमध्ये ‘शिवराष्ट्र हायकर्स’ ची व्यवस्था अतिशय चोख होती. कुठेही गडबड, गोंधळ, गैरसोय आढळून आली नाही. असा ट्रेक आयोजित करण्याचा त्यांचा २४ वर्षाचा अनुभव आहे याची प्रचिती आली.  

"Panhala

"Mhasai

"Mhasai

"Panhala"Rock"

"Panhala

"Panhala  

"Panhala

"pavan"

"Shiva

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.