पवना परिसर खुणावतोय पर्यटकांना

(श्रीपाद शिंदे)

एमपीसी न्यूज – डोंगर द-यांमधून संथपणे वाहत येणारे, उंचावरून पडणारे स्वच्छ पाणी, हिरवाईने नटलेला संपूर्ण परिसर, धरणातील स्तब्ध पाणी, अरुंद रस्ता, गाड्यांची रेलचेल त्यातच सत्याच्या कडेला मक्याची कणसे, चहा, कांदाभजी, बटाटाभजी, वडापाव, भेळ अशा चटकदार पदार्थांनी सजलेले छोटे स्टॉल आणि कधी थांबून तर कधी सतत पडणारा पाऊस असे मनमोहक, विलक्षण निसर्गाचं रूप पवना धरणावर बघायला मिळत आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरातील धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा म्हणून बरेच पर्यटक पवना परिसराची निवड करतात.

पवना डॅमकडे दोन मार्गांनी जाता येते. पुणेकरांसाठी कामशेत मार्गे तर मुंबईकरांसाठी लोणावळा मार्गे. पुण्यावरून जुना पुणे मुंबई हायवे मार्गे कामशेत अवघे 52 किलोमीटरवर आहे. कामशेतवरून डावीकडे राऊतवाडी, कडधे गाव, पवनानगर मार्गे पवना डॅमपर्यंत पोहोचू शकतो. कामशेतवरून पवना डॅम 20 किलोमीटर अंतर आहे. वाटेत जाताना आडवळणांचा रस्ता, घाट, डोंगर यांचं विलोभनीय दर्शन होतं. मुंबईवरून येताना लोणावळ्यामधून दुधिवरे खिंड मार्गे जाता येते. लोणावळ्यातून निघाल्यास 9 किलोमीटरवर दुधिवरे खिंड आहे. ही खिंड बाजीप्रभूंनी लढविलेल्या खिंडीला शोभावी तशी खिंड आहे. उंच डोंगर पोखरून जाणारा अरुंद रस्ता काळजाचा ठोका चुकवतो. खिंडीतील काही दगड जीर्ण झाले असल्याने तिथं थांबणं जरा धोक्याचं आहे. परंतु गाडी खिंडीतून जात असताना झिरपलेलं पाणी अंगावर काटा आणते. खिंडीतून पुढे 7 किलोमीटरवर पवना डॅम आहे.

अगदी सर्वांनीच पवना डॅमवर जाण्याची गरज नाही. जाताना रस्त्याच्या कडेला असलेला मनमोहक निसर्ग आपलं लक्ष वेधून घेतो. तिथं आपण रमलो कि आपला दिवस कसा जातो हे आपल्यालाच कळत नाही. उंचावरून पडणारे पाणी अंगावर घेण्यासाठी पर्यटकांची तुडुंब गर्दी होते. काही ठिकाणी तर चक्क पाण्यात भिजण्यासाठी रांगा लागलेल्या दिसतात. कधी डोंगरावरून पडणा-या पाण्यात तर कधी आभाळातून पडणा-या पाण्यात भिजत, कुडकुडत कडाक्याची भूक लागली तर काहीच नवल नाही. रस्त्याने जात असताना जागोजाग त्याची देखील सोय आहे. गरमागरम लालबुंद विस्तवावर भाजलेली मक्याची कणसे खाताना अंगावर आलेला काटा क्षणात निघून जातो. त्यासोबतच हंगामी फळे सुद्धा इथे चाखायला मिळतील.

भौतिक सुखाच्या जगात कितीही धावत राहिलो तरी समाधान कधीच होत नाही. पण निसर्गाच्या सानिध्यात एक दिवस जरी घालवला तरी भरून पावल्यासारखा अनुभव येतो. मानाचं समाधान करण्याचं वरदान निसर्गाकडे आपले हक्क राखूनच आहे. इथं एकटं असलं तरी कधी एकटेपणा जाणवत नाही. सतत आपल्याला कोणीतरी पाहतंय असा भास होतो. अदृश्य असणा-या निसर्गाशी बोलण्यात तासंतास घालवण्यात एक वेगळीच मजा आहे. कधीतरी आपण सर्वांनी ही मजा अनुभवून पाहायला हवी. खळखळ वाहणारं पाणी जणू गाणं गुणगुणत आपल्या नादात चालत राहतं. इथं कोणीच कुणाशी शरीराने बोलत नाही पण मनाचा थांग मात्र सर्वांनाच लागतो. फक्त अट मात्र एकच ती म्हणजे भावना शुद्ध असावी.

भरकटलेल्या तरुणाईचा निसर्गाला त्रास

जवानीच्या धुंदीत शरीरानं तरुण दिसणारी पण विचारानं अगदी म्हातारी किंवा बालिश असेलेली बरीच मंडळी या भागात पाहायला मिळते. दुचाकींचा कर्कश आवाज करत, ओरडत हे तथाकथित तरुण अरुंद रस्त्यावरून बेधुंदपणे गाड्या चालवतात. रस्त्याने जाणा-या पर्यटकांना त्रास होईल असं बघणं, बोलणं आणि वागणं जणू यांची फॅशनच झाली आहे. पवना धरणाच्या कडेला असलेल्या डोंगरावर जागोजागी दारूच्या वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या बाटल्यांचे दर्शन आपल्याला होते.

जागोजागी गाड्या पार्क करून तिथं राजरोसपणे दारू पिण्याचा प्रकार दिसतो. फुटलेल्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, अंगावरचे फाडलेले कपडे आणि इतर कचरा सर्रास दिसतो. माणसांच्या अशा वर्तनाने निसर्गातील एकही पशु अथवा पक्षी त्या भागात साधा भटकताना देखील दिसत नाही. हिरवाईने नटलेला डोंगर पण त्यावर एकही प्राणी अथवा पक्षी नाही ही कल्पनाच करवत नाही. पण हे आजचं तिथलं वास्तव आहे. कदाचित हे वास्तव उद्या पृथ्वीवर सगळीकडेच बघायला मिळेल. निसर्गाला नाहक त्रास देणं मानवानं बंद केलं तर या भागात स्वर्गाची अनुभूती येईल.

"ferfatka"
"ferfatka
"ferfatka
"ferfatka
"ferfatka
"ferfatka
"ferfatka

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.