केजे शिक्षण संस्थेमध्ये माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात


एमपीसी न्यूज – केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या केजे अभियांत्रिकी, ट्रिनिटी अभियांत्रिकी व ट्रिनिटी अकॅडेमी या तीनही महाविद्यालयातून उत्तीर्ण होऊन विविध सेवा क्षेत्र व उद्योजक क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असणा-या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यशस्वी माजी विद्यार्थ्यांतर्फे सध्या महाविद्यालयात शिकत असणा-या विद्यार्थ्यांना सेवा क्षेत्र व उद्योजगतेवर मार्गदर्शन करण्यात आले.

संस्थेचे खजिनदार विनोद जाधव यांनी अशा वैविध्यपूर्ण उपक्रमाची संकल्पना मांडली होती. या कार्यक्रमामध्ये नवोदित विद्यार्थ्यांनी जेष्ठांना विविध प्रश्न विचारले. मुलाखत कशी द्यावी, तणावाची स्थिती कशी सांभाळावी, परकीय भाषेचे ज्ञान असावे का?, नियमित अभ्यासक्रम हाताळताना आणखी कुठले ज्ञान असावे, तसेच अभियांत्रिकी शाखानुसार कोणते कौशल्य असावे, अशा विविध प्रश्नांचा सविस्तर उहापोह झाला. या कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असणा-या पंचावन्न विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

12 लाख प्रतिवर्ष एवढे सर्वोच्च पॅकेज मिळालेल्या ताहेर अजनावाला या विद्यार्थ्याची मुलाखत घेण्यात आली. स्वतःच्या प्रयत्नावर अनिकेत लगड (इलेक्ट्रॉनिक) या विद्यार्थ्याने कॉर्पोरेट क्षेत्रात कशी प्रगती केली, याविषयीचे त्याने अनुभव व्यक्त केले. त्यामुळे सर्वसाधारण विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावला. अनेक माजी विद्यार्थ्यांनी परदेशी उच्च शिक्षणाच्या संधी, अर्थपुरवठा व अनुभव व्यक्त केला. संस्थेच्या आवारातील झेन्सार कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 2008 साली स्थापन झालेल्या या संस्थेची तीन अभियांत्रिकी असून आजवर तीन हजारापेक्षाही जास्त विद्यार्थी सेवा क्षेत्र व उद्योजक क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करीत आहेत. यामध्ये समसमान संख्येने मुलींनी अनुभव व्यक्त केले. भरगच्च संख्येने नवोदित विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालक हर्षदा जाधव, विभावरी जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, केजे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत, ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश डबीर व ट्रिनिटी अकॅडमी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय वढाई यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन ट्रैनिंग व प्लेसमेंट विभागप्रमुख प्रमोद दस्तूरकर व राहुल उंडेगावकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.