आयुर्वेदाला संशोधन, तंत्रज्ञानाची जोड हवी – डॉ. अरुण जामकर

केशायुर्वेदच्या वर्धापनदिनानिमित्त पुस्तक प्रकाशन व सत्कार

एमपीसी न्यूज – आयुर्वेद हे भारतीय परंपरेने दिलेले आपले शास्त्र आहे. त्यामध्ये अनेक मोठ्या आजारांनाही बरे करण्याची क्षमता आहे. आयुर्वेदाला तंत्रज्ञान आणि संशोधनाची जोड मिळाल्यास त्यामध्ये सुपरस्पेशालिटी येऊ शकते. केसांवर उपचारपद्धती विकसित करणारे केशायुर्वेद हे त्याचे आदर्श उदाहरण आहे, असे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी केले.

आरोग्यवर्धिनी चिकित्सालय आणि बीव्हीजी इंडियातर्फे ‘केशायुर्वेद’च्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त टिळक स्मारक मंदिरात आयोजित ‘आयुर्वेदाच्या स्मृतीतून’ पुस्तकाचे प्रकाशन व केशायुर्वेदच्या तीस उपकेंद्र प्रमुखांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी बीव्हीजी इंडियाचे संचालक दत्ताजी गायकवाड, संचालिका वैशाली गायकवाड, स्वप्नाली गायकवाड, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. सतीश डुंबरे, आयुषच्या संचालिका डॉ. सरिता गायकवाड, केशायुर्वेदचे संचालक वैद्य हरीश पाटणकर, स्नेहल पाटणकर आदी उपस्थित होते. यावेळी असोसिएशन ऑफ कॉस्मेटॉलॉजी, ट्रायकोलॉजी अॅण्ड टेक्नॉलॉजीची स्थापना करण्यात आली.

अरुण जामकर म्हणाले की, आयुर्वेदिक उपचारपद्धतीचा अभ्यास करून सुपरस्पेशालिटी मिळविण्याकडे सध्या कल वाढत आहे. परंतु, आयुर्वेदात आणखी मोठ्या प्रमाणात संशोधन होणे गरजेचे आहे. केसांची आयुर्वेदाच्या साहाय्याने निगरानी होणे ही काळाची गरज आहे. आयुर्वेदाची सेवा करणाऱ्यांनी त्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. आपण करीत असेलल्या संशोधनाचे दस्त जपले पाहिजेत. त्याला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे.

मंदार जोगळेकर म्हणाले की, आयुर्वेदामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधन होत आहे, ही जमेची बाजू आहे. पाश्चात्य देशांमध्ये संशोधनाच्या जोरावर आयुर्वेद सिद्ध केले जात आहे. अशावेळी आपले मूळ शास्त्र असलेले आयुर्वेद जगभर पोहोचले पाहिजे. त्यासाठी संशोधन आणि साहित्यनिर्मिती व्हायला हवी. मराठीमध्ये मोठी साहित्यनिर्मिती होते; ती ईबुक, ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

डॉ. सरिता गायकवाड म्हणाल्या की, आयुर्वेदात सुपरस्पेशालिटी येणे ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र, आयुर्वेदात क्षमता असूनही वारंवार आयुर्वेद शास्त्र आहे, हे सिद्ध करावे लागते. आयुर्वेदात शरीररचना आणि राहणीमान यावरून सगळ्यांचा विचार करावा लागतो. आयुर्वेदात क्षमता आहे. ती समजून घेतले पाहिजे. विविध चिकित्सेच्या माध्यमातून आयुर्वेदाची क्षमता सिद्ध करावी. विज्ञाननिष्ठ असलेल्या मराठी व संस्कृत भाषेत आयुर्वेद ताकदीनिशी मांडले आहे.

डॉ. सतीश डुंबरे म्हणाले की, केसांवर आयुर्वेदातून उपचार हा नवीन विचार आहे. अशा प्रकारचा अभ्यासक्रम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात फेलोशिपच्या अंतर्गत सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. आयुर्वेदाच्या माध्यमातून वेगळा विचार देऊ. या सगळ्या अभ्यासाला संशोधनाचे स्वरूप यावे. आयुर्वेद सखोल शिकण्याची गरज असते. अरुण महाराज यांचे पारद शिवलिंग प्रयोग सादरीकरण झाले. वैशाली गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. वैद्य हरीश पाटणकर यांनी प्रास्ताविक केले.  शुभदा कुलकर्णी यांनी धन्वंतरी स्तवन म्हटले. विवेक आंबरे यांनी सूत्रसंचालन केले. आभार स्नेहल पाटणकर यांनी मानले.

विद्यार्थी सहायक समितीचा गौरव

गरीब, गरजू विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन व व्यक्तिमत्व विकासासाठी काम करीत असलेल्या विद्यार्थी सहाय्यक समितीच्या कार्याचा गौरव करत मंदार जोगळेकर यांनी समितीप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जोगळेकर व हरीश पाटणकर या दोघांनीही समितीत राहून शिक्षण घेतले आहे. त्यावेळच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या. आपल्या जडणघडणीत समितीचे मोठे योगदान असून, समितीच्या सहकार्याने आज जीवनात यशस्वी झालो असल्याचे जोगळेकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.