लोणावळ्यात गेल्या 24 तासात 111 मिमी पाऊस; धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ

एमपीसी न्यूज – लोणावळा परिसरात मागील आठवडा भरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने परिसरातील सर्व धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मागील 24 तासात लोणावळ्यात 111 मिमी पावसाची नोंद झाली. लोणावळ्यात आज पर्यत 2620 मिमी (103.15 इंच) ऐवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आज अखेर 1855 मिमी (73.03 इंच) पाऊस झाला होता. मागील सात दिवसात शहरात तब्बल 855 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा करणारे पवना धरण 72 टक्के तर लोणावळा परिसरातील वलवण धरण 63 टक्के, तुंगार्ली धरण 70 टक्के भरले आहे. मावळातील लहान व मध्यम आकाराची धरणे असलेल्या भुशी, लोणावळा धरण, वाडीवळे ही धरणे पूर्ण भरली आहेत.  मात्र, संततधार पावसामुळे लोणावळ्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाची संततधार थांबण्याचे नाव घेत नसल्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणे जिकिरीचे झाले आहे. पावसाच्या संततधारेमुळे व सूर्यनारायणाचे दर्शन होत नसल्यामुळे साथीचे आजार वाढू लागले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.