रसिकांनी अनुभविली व्हायोलिन वादनाची नादमय सायंकाळ

डॉ. एन. राजन आणि संगीता, रागिनी, नंदिनी शंकर यांचे व्हायोलिन वादन 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव

एमपीसी न्यूज – तरल ध्वनीतून निर्माण होणारा मधूर नाद… व्हायोलिनच्या कर्णमधुर लयीमुळे सजलेली वादन मैफल… मनाचा ठाव घेणा-या अल्हाददायक वादनात तल्लीन झालेले रसिक… अशा भारलेल्या वातावरणात व्हायोलिन वादनाची श्रवणीय अनुभूती रसिकांनी घेतली. व्हायोलिन वादक डॉ. एन. राजन आणि संगीता, रागिनी, नंदिनी शंकर यांच्या व्हायोलिन वादनाची नादमय सायंकाळ पुणेकरांनी अनुभविली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (125) वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये व्हायोलिन परंपरा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्हायोलिन वादक एन. राजन आणि संगीता, रागिनी, नंदिनी शंकर यांनी आपल्या मनोहारी वादनातून व्हायोलिन वादनाची परंपरा रसिकांसमोर उलगडून दाखविली. वादन मैफलीची सुरुवात मेघ मल्हार रागाने झाली. या रागातील विविध रचनांच्या सादरीकरणाने डॉ. एन्. राजन यांनी आपल्या लयबद्ध वादनाचा वर्षाव रसिकांवर केला. यानंतर सादर केलेल्या झिंझोटी रागातील बंदिशींना रसिकांनी दाद दिली.

उत्तरोत्तर रंगलेल्या तालमैफलीत पायोरी मैने राम रतन धन पायो… या भजनाच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. नरवर कृष्णा समान… या नाट्यपदाच्या सादरीकरणाला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. मैफलीची सांगता भैरवी रागातील सुनेरी मैने निर्बल के बलराम… या भजनाने झाली. यति भागवत आणि रोहित मुजूमदार (तबला) यांनी साथसंगत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.