जय विजय करंडकावर रमणबागेची मोहोर

आदर्श विद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

एमपीसी न्यूज – शुक्रवार पेठेतील आदर्श विद्यालय माजी विद्यार्थी संघटना नातूबाग परिसराच्या वतीने विविध शाळांमधील माजी विद्यार्थ्यांसाठी आयोजित जय-विजय करंडक 2017 या एकांकिका स्पर्धेत रमणबागेच्या माजी विद्यार्थ्यांना बाजी मारली. द एन्ड ऑफ… या रमणबागेच्या एकांकिकेला प्रथम पारितोषिक मिळाले. तर, वसुंधरायण या एकांकिकेसाठी अहिल्यादेवी प्रशालेच्या माजी विद्यार्थीनींनी द्वितीय क्रमांक आणि आम्ही अभिनव या गटाने बोन्साय या एकांकिकेसाठी तृतीय क्रमांक पटकावित जय विजय करंडक एकांकिका स्पर्धा गाजविली. 

भरतनाट्य मंदिर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांच्या हस्ते झाले. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा उर्मिला देव, कार्याध्यक्षा अंजली मते-धुमाळ, अर्चना त्रिभुवन, विजय कोटस्थाने, भालचंद्र पुरंदरे, शेखर भागवत, दिपाली निरगुडकर, अरुण पटवर्धन, अ‍ॅड. सुभाष मोहिते, आयोजक प्रदीप अष्टपुत्रे,  प्रशांत मते, संदीप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

सुनील गोडबोले म्हणाले की, जेव्हा एखादा कलाकार कोणत्याही कलाकृतीमध्ये सहभागी होतो, त्यावेळी त्याकडे स्पर्धा म्हणून पाहू नये. स्पर्धात्मक काम न करता मनाला समाधान मिळेल, असे काम कलाकाराने करायला हवे. प्रत्येक कलाकाराला आपल्या कलेचा आनंद घेता आला, तर त्याला नक्कीच यश मिळेल.

भालचंद्र पुरंदरे म्हणाले की, शालेय जीवनात अभिनयाला खूप महत्व असते. मुलांना त्यांचे कल्पनाविश्व मांडण्याकरिता व्यासपीठ मिळायला हवे. कलाक्षेत्र अधिक उत्तम बनविले तर विद्यार्थ्यांना यामध्ये अधिक संधी उपलब्ध होतील. प्रदीप अष्टपुत्रे म्हणाले की, अभिनय क्षेत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच पुण्यातील माजी विद्यार्थी संघटना एकत्रित याव्या, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेत रवींद्र सातपुते यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाकरिता विशेष पारितोषिक देण्यात आले. उत्तम अभिनयाकरिता पुरूष गटात प्रथम पारितोषिक डॉ. अमित त्रिभूवन, द्वितीय शैलेश यादव यांना मिळाले. तसेच स्त्री गटात प्रथम पारितोषिक नीरजा वडके आणि द्वितीय अंकिता बिराजदार यांना मिळाले. प्रदीप अष्टपुत्रे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.