लोककला व सांस्कृतिक कार्यक्रमांना जीएसटीची झळ; दुरावलेल्या प्रेक्षकांसाठी लावणी निर्मात्यांची व्हॉट्स अप ऑफर!

एमपीसी न्यूज – जीएसटी लागू होऊन एक महिना उलटल्यानंतर त्याचे परिणाम दिसायला सुरुवात झाली असून मनोरंजन क्षेत्रावरील 18 टक्क्यांच्या करामुळे सांस्कृतिक व लोककला कार्यक्रमांना याची मोठी झळ बसल्याचे दिसून येत आहे. तसेच वाढलेल्या दरामुळे रसिक प्रेक्षक दुरावत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी काही लावणी निर्मात्यांनी व्हॉट्स अप डिस्काऊंट ऑफरची शक्कल लढवली आहे.

कला व सांस्कृतिक कार्यक्रमांचे माहेरघर असलेल्या पुण्यात जीएसटीमुळे मराठी खेळांना विशेष आर्थिक फटका बसला आहे, असे लोककला क्षेत्राशी निगडीत लोकांनी सांगितले आहे. जीएसटीमुळे जवळपास 40 ते 50 टक्के शो कमी झाले आहे. विशेत्वाने लावणीला याचा चांगलाच फटका बसला आहे. तिकिटावर 18 टक्के जीसटी आकारण्यात येतो. त्यातच कलाकारांच्या मानधनाशिवाय प्रवास व राहणे-जेवण व इतर सुविधांचा खर्चाचे व्यवस्थापन करणे अशक्य झाले आहे.

या सर्वांमुळे तिकिटाचे दर वाढवण्यात आले आहे. मात्र, वाढलेल्या दरामुळे प्रेक्षकवर्ग दुरावला असून तिकीटाचे दर वाढवणे अशक्य होत आहे. परिणामी नुकसानीत जाणारा व्यवसाय बंद करण्याच्या विचारात असल्याचे काही निर्मात्यांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बालगंधर्वात होणा-या तीन खेळांपैकी आता केवळ एक ते दोनच खेळ करण्याची वेळ जीएसटीमुळे आली आहे.

तर काही लावणी निर्मात्यांनी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी व्हॉट्स अप वरून तिकिटावर डिस्काऊंट ऑफर देण्याची शक्कल लढवली आहे. यामध्ये निर्मात्यांनी व्हॉट्स अप वर ग्रुप करून त्यावर वर्तमानपत्रातील जाहिरातींच्या चित्रांची लिंक तयार करून पाठवण्यात येत आहे. ही लिंक तिकीट खिडकीवर दाखविल्यानंतर तिकिट सवलतीच्या दरात मिळणार आहे.

"lavni"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.