अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजाने मार्गक्रमण करावे – महापौर काळजे

एमपीसी न्यूज – दीड दिवस शाळेत जाऊन समाजाला प्रेरणा देणारे महान कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केले. त्यांच्या विचारांची व कार्य कर्तृत्वाची प्रेरणा घेऊन समाजाने मार्गक्रमण करावे, असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन त्यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, विधी समिती सभापती शारदा सोनावणे, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, नामदेव ढाके, नगसदस्या सीमा चौघुले, माधवी राजापुरे, कमल घोलप, यशोदा बोईनवाड, निकिता कदम, अनुराधा गोरखे, माजी नगरसदस्य उत्तम हिरवे, प्रल्हाद सुधारे, रामचंद्र माने, किसनराव नेटके, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्यासह अण्णाभाऊ साठे संयोजन समितीचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते.

महापौर नितीन काळजे म्हणाले की, समाजातील तळागाळातल्या वर्गाला बरोबर घेऊन चालणारे अण्णाभाऊ होते. समाजातील तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन समाजातील इतर घटकांना सुशिक्षित केले पाहिजे. या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने कलाकारांना प्रोत्साहन देणा-या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा तसेच आयोजित सांस्कृतिक कार्यकमांचाही लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, समाजाच्या उन्नतीसाठी सर्व पदाधिकारी, नगरसदस्य, नगरसदस्या काम करत आहेत. झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी काम केले जाईल. अण्णाभाऊ साठे यांच्या वारसांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न केले जातील. शहरातील गोरगरीब, दलित बांधवांसाठी केंद्र, राज्य व महापालिका राबवित असलेल्या योजना, अनुदान, शिष्यवृत्ती आदी लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी केले तर आभार नगरसदस्य उत्तम केंदळे यांनी मानले.

दरम्यान, सकाळ सत्रात चंदन कांबळे आणि संच यांचा शाहिरी जलसा, कुमारी पल्लवी घोडे यांचा प्रबोधनपर गीत गायनाचा तर शाहीर बापू पवार यांचा गरजला सिंहाचा छावा हा सादर करण्यात आला. दुपार सत्रात भव्य बँण्ड स्पर्धा व सनई वादनाच्या कार्यक्रमासह शैलेश लेले यांचा महाराष्ट्राचा शाहिरी बाणा हा कार्यक्रम संपन्न झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.