Thergaon : पदमजी पेपर मिलजवळ भूमिगत चेंबरला आग

एमपीसी न्यूज- पदमजी पेपर मिलजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या भूमिगत चेंबरला अचानक आग लागून परिसरात धूर पसरला. ही घटना गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास घडली.

पदमजी पेपर मिलच्या बाजूने रस्त्याच्या कडेला डांगे चौकापासून बिर्ला हॉस्पिटलपर्यंत केबल टाकण्यासाठी चेंबर बांधण्यात आले आहे. हे चेंबर सिमेंटचे ब्लॉक टाकून झाकण्यात आले आहे. काल , गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास सिमेंटच्या ब्लॉकमध्ये असलेल्या फटींमधून आगीच्या ज्वाळा येऊ लागल्या. परिसरात धूर पसरला.

आग लागल्याचे समजताच लवकुश मित्र मंडळाचे संचालक जयपाल गायकवाड त्याच क्षणी तिथे पोहचले सोबत थेरगाव सोशल फौंडेशनचे सदस्य अनिल घोडेकर व युवराज पाटील, अनिकेत प्रभू यांनी देखील धाव घेतली. त्यांनी त्वरित अग्निशामक दलाला याची माहिती दिली. तत्पूर्वी लवकुश मित्र मंडळ, बजरंग दल व पदमजी पेपर मिलच्या सुरक्षारक्षकांनी आगीवर माती टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रहाटणी अग्निशामक केंद्र येथून आलेल्या गाडीने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

या चेंबरवर पदमजी पेपर मिलमधील कर्मचारी आपल्या दुचाक्या उभ्या करतात. त्याचप्रमाणे कागद भरलेले ट्रक या ठिकाणी उभे केले जातात. आग पसरली असती तर मोठा अनर्थ घडला असता असे थेरगाव सोशल फौंडेशनचे सदस्य अनिकेत प्रभू यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.