Dehuroad : पूर्ववैमनस्यातून ‘चिक्कू’ने केले तरुणावर वार
एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून चिक्कू आणि त्याच्या पाच सहका-यांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार केले. तसेच त्याला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 9) दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवाजीनगर देहूरोड येथे घडली.
अरबाज मेहमूद शेख (वय 20, रा. शिवाजीनगर, देहूरोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोबीन उर्फ बुग्गी शेख, संदीप खनसे, विजय खनसे, अमीन शेख, सूर्या, चिक्कू (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी अरबाज त्याच्या शितळानगर येथे रहाणा-या काकांकडे गेला होता. काकांच्या घरासमोर उभा असताना सर्व आरोपी तिथे आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या रागातून अरबाजला मारहाण केली. बुग्गीने कोयता भिरकावून मारला. अरबाजला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पुंडीचाळ येथे नेले. तिथे चिक्कूने अरबाजच्या हातावर कोयत्याने मारले. जीव वाचवण्यासाठी अरबाज रस्त्याने पळू लागला. त्यावेळी शिवाजी विद्यालयासमोर त्याचे काका आले आणि अरबाज त्यांच्यासोबत निघून गेला. यामध्ये अरबाज गंभीर जखमी झाला. देहूरोड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.