Pune : आचारसंहितेपूर्वी सातवा वेतन आयोग लागू करा, अन्यथा तीव्र आंदोलन, मतदानावर बहिष्कार

अपंग शाळा-शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेलचा इशारा

एमपीसी न्यूज – राज्य सरकारच्या सर्व विभागाला सातवा वेतन आयोग लागू केला असून केवळ दिव्यांग शाळेतील शिक्षकांना त्यापासून वंचित ठेवले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करुन निवडणूक आणि मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा बहुजन शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघाच्या पुण्यातील अपंग शाळा-शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेलने दिला आहे.

याबाबत सेलचे सचिव रावसाहेब कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, राज्य सरकारच्या सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अनुदान तत्वावर दिव्यांगांच्या शाळा चालतात. 852 विशेष शाळा, कार्यशाळा, वसतिगृहे, बालगृहांमध्ये महाराष्ट्रात 22000 हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु, राज्य सरकारने या कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू केला नाही. कर्मचा-यांवर घोर अन्याय केला आहे.

सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत विविधि संघटनांच्या पदाधिका-यांनी सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेतली. परंतु, लवकरच आयोग लागू केला जाईल, मंत्र्यांनी असे पोकळ आश्वासन देऊन कर्मचा-यांची बोळवण करुन भ्रमनिरास दिल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.