Alandi : धक्कादायक! प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून जिवंत अर्भक झुडपांमध्ये फेकले

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील मरकळ मधील सुदर्शन वस्ती येथे प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले (Alandi) एक दिवसाचे अर्भक आढळले. पडत्या पावसात प्लास्टिकच्या पिशवीत ठेऊन त्याचा परित्याग करण्यात आला आहे. सध्या बाळावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. 20) दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आला.

मरकळ गावचे पोलीस पाटील विठ्ठल टाकळकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरकळ मधील सुदर्शन वस्ती येथे क्रिएटीव्ह इंटरप्रायजेस या कंपनीजवळून कच्चा रस्ता जातो.

या रस्त्यावर जास्त रहदारी नसते. क्रिएटीव्ह इंटरप्रायजेस या कंपनीजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपांमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून एक बाळ सोडले असल्याची बाब मरकळ गावचे पोलीस पाटील विठ्ठल टाकळकर यांच्या निदर्शनास आली.

टाकळकर यांनी तत्काळ आळंदी पोलिसांना माहिती दिली. आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला ताब्यात घेतले.

रिमझिम पडणाऱ्या पावसात प्लास्टिकच्या पिशवीत थंडीत कुडकुडणाऱ्या बाळाला पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्याला थंडीमुळे इन्फेक्शन झाले असल्याचे निदान झाल्याने त्याला औंध येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

औंध रुग्णालयात त्या एक दिवसाच्या बाळावर पुढील तीन ते चार दिवस उपचार केले जाणार आहेत.

Chinchwad : बोगस सीबीआय अधिकाऱ्याला अटक, अटक करण्याची धमकी देत व्यावसायिकाला घातला साडेपाच लाखांचा गंडा

घटनास्थळाजवळ असलेल्या एका कंपनीचे सीसीटीव्ही रस्त्याच्या दिशेने आहेत. मात्र कंपनी मागील आठ दिवसांपासून बंद आहे.

घटनास्थळाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांना तपासात अडथळे येत आहेत. आळंदी पोलीस अज्ञात पालकांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, आळंदी पोलिसांनी जिल्हा बालकल्याण समितीला घटनेची माहिती दिली आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर बाल कल्याण समितीच्या आदेशाने बाळाला संबंधित संस्थेत सोडले जाणार आहे.

कुठलाही गुन्हा नसताना अवघ्या एका दिवसात पालकांनी बाळाचे पालकत्व नाकारून त्याचा परित्याग केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात (Alandi) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.