Alandi : आळंदी मधील ‘त्या’ प्रकारापूर्वीचा व्हिडीओ आला समोर; पोलिसांना तुडवून वारक-यांचा मंदिरात घुसण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी ( Alandi ) प्रस्थानावेळी वारकरी आणि पोलीस यांच्यात किरकोळ वाद आणि झटापटी झाली. पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचा आरोप वारक-यांकडून करण्यात आला. त्यानंतर आणखी व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये वारकऱ्यांनी पोलिसांना तुडवून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रविवारी (दि. 11) आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत तीन बैठका पार पडल्या. मागील वर्षी पालखी सोहळ्यात गर्दीमुळे चेंगरा चेंगरी झाली होती. अशा परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पंढरपूरला जाण्यासाठी शेकडो दिंड्या आळंदीत दाखल होतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वैष्णवांचा मेळा अलंकापुरीत दाखल होतो. पालखी प्रस्थानाच्या वेळी महापूजा करून टाळ मृदंगाच्या गजरात पालखीचे प्रस्थान होते. यावेळी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे यावर्षी मानाच्या 56 दिंड्यांमधील प्रत्येकी 75 वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून ठरवण्यात आले.

मनाच्या दिंड्यांमधील तब्बल सव्वा चार हजार पेक्षा अधिक वारकरी, मंदिर समितीचे पदाधिकारी, वारकरी, इतर प्रमुख मंडळी, सुरक्षा राखणारे पोलीस असे सुमारे पाच हजार जणांनी मंदिर भरून गेले. त्यात पालखी प्रस्थानावेळी आणखी शेकडो वारकरी मंदिरात घुसण्यासाठी प्रयत्न करीत होते. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे पोलिसांनी वारकऱ्यांना मंदिरात सोडण्यासाठी विरोध केला.

Maval : दुसऱ्या दक्षिण आशियाई कुंग फु स्पर्धेत मावळ मधील खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी; तब्बल 30 खेळाडूंना बक्षिसे

दरम्यान, वारकऱ्यांनी पोलिसांना अक्षरशः तुडवून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये पोलीस वारकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वारकऱ्यांनी अचानक पोलिसांना ढकलून त्यांना तुडवून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी जबरदस्तीने मंदिरात जाणाऱ्या वारकऱ्यांना बाजूला ढकलून पांगवले. दरम्यान, पोलिसांनी लाठ्या उगारल्या असल्याचा एक व्हिडीओ सुरुवातीला समोर आला होता.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, “गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत तीन वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेतला होता. त्यानुसार तसे नियोजन देखील करण्यात आले. मानाच्या दिंडीप्रमुखांनी हा निर्णय मान्य केला होता. त्यानुसार पासेस वितरित केले होते.

मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडीतील प्रत्येकी 75 जणांनाच पाठवित होते. मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते. बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केला नसल्याचेही पोलीस ( Alandi ) आयुक्त म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.