Bhosari : दहा महिन्यांपूर्वी केलेल्या मस्करीच्या रागातून तरुणाला मारहाण

 

एमपीसी न्यूज – दहा महिन्यांपूर्वी केलेल्या मस्करीच्या रागातून चौघांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मोशी येथे 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दिघी येथे घडली.

संतोष भानुदास जांभूळकर (वय 27, रा. खेड. मूळ रा. बुगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सचिन मोहिते व त्याच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभुळकर आणि सचिन हे दोघेजण मित्र आहेत. जांभुळकर यांनी सचिन याची 15 जानेवारी 2018 रोजी मस्करी केली. याचा राग मनात धरून सचिन याने दहा महिन्यानंतर 15 ऑक्टोबर 2018 रोजी जांभुळकर यांना दिघी येथील सुनील नगर मोशी येथील एका बंद पडलेल्या बांधकामावर नेऊन शिवीगाळ करत लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या भांडणात सचिन याने सिमेंटचा गट्टू जांभुळकर यांच्या छातीवर व डाव्या कानावर मारला. यामध्ये जांभुळकर गंभीर जखमी झाले. मारहाण केल्यानंतर सचिन याने जांभुळकर यांना ‘पोलिसात तक्रार केल्यास तुझ्याकडे बघून घेतो’ अशी धमकी दिली. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.