Pune : शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर कृषी महाविद्यालयाच्या जागेवर

शिवाजीनगर बस स्थानकाच्या जागेवर महामेट्रोकडून मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हब  

एमपीसी न्यूज – मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भूयारी मार्गाच्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर करण्यात येणार आहे. या जागेवर महामेट्रोकडून मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे.  तब्बल दोन वर्षांपेक्षा जास्त काळ ते मूळा रस्त्यावरील कृषी महाविद्यालयाच्या जागेवर जाणार आहे.स्थलांतरासाठी एस.टी महामंडळाने परवानगी दिली असल्याची माहिती महामेट्रोच्या शिवाजी नगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे कार्यकारी संचालक प्रमोद अहुजा यांनी दिली. जानेवारी 2019 मध्ये या कामाला सुरूवात होणार आहे.

महामेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गावर रेंजहिल्स ते स्वारगेट  या 5 किलोमीटरच्या या भूयारी मार्ग आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या बरोबर खाली मेट्रोचे स्थानक असणार आहे. ते काम सुरू करण्यासाठी म्हणून एसटी स्थानक हलवण्यात येईल. मुळा रस्त्यावर कृषी महाविद्यालयाची एक जागा आहे. त्या जागेवर एसटी स्थानक असणार आहे. त्याचे आता आहे तसेच बांधकाम महामेट्रो करून देणार आहे.

आहूजा म्हणाले, हा मार्ग 5 किलोमीटरचा आहे. त्यात 5 भूयारी स्थानके असतील. शिवाजीनगरपासून काही किलोमीटर अलिकडे रेंजहिल येथे मेट्रोचा भूयारात प्रवेश होईल. तिथे एक स्थानक असेल. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या आताच्या जागेवर भूयारी मार्गातील दुसरे, त्यापुढे फडके हौद (कसबा पेठ), मंडई (जुनी मिनर्व्हा टॉकिजजवळ) व स्वारगेट अशी 5 भुयारी स्थानके असतील. त्यातील शिवाजीनगर एसटी स्थानकाजवळचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही येत्या 15 दिवसात पुर्ण होईल. जानेवारीच्या सुमारास कामाला प्रत्यक्ष सुरूवात होईल. मेट्रो भुयारात शिरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या शाफ्टचे काम सुरू झाले आहे.

सर्व कामांची आरेखने तयार व अंतीम झाली असल्याची माहिती देऊन आहूजा म्हणाले, भूयारी काम बरेच क्लिष्ट आहे. त्यामुळे किमान 2 वर्षे तरी शिवाजीनगर एसटी स्थानक बाहेरच असेल. भुयारी स्थानकाचे काम झाल्यावर मात्र पुन्हा पुर्वीच्याच जागी एसटी स्थानक बांधण्यात येईल. हा सर्व खर्च अर्थातच मेट्रो करणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाची संमती मिळाली आहे. फडके हौद व अन्य काही स्थानकांच्या इथे खासगी जागा संपादन करावे लागणार आहे. फडके हौद वगळता अन्य ठिकाणी फारशा अडचणी नाहीत. फडके हौदाजवळ मात्र काही कुटुंबे यात बाधीत होणार आहेत. त्यांना जागा देण्यात येईल. जागा मालकांनाही नुकसान भरपाई देण्यात येईल. याबाबत बोलणी सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.