Pune : दीपक मानकर यांच्या अडचणीत वाढ ; कोट्यवधींच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज – सामाजिक कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिपक मानकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मानकर यांच्यासह तिघांवर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये कोट्यवधींची फसवणूक केल्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदिती माधव दिक्षीत (वय 52, रा. लक्ष्मी निवास, प्रभात रोड, डेक्कन) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिपक माधवराव मानकर (रा. भांडारकर रोड, पुणे ), साधना वर्तक (रा. कोथरूड) आणि मुकुंद परशुराम दिक्षीत (रा. कोथरूड) यांच्याविरूध्द  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  2013 ते सन 2018 दरम्यान हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, मानकर, वर्तक आणि दिक्षीत यांनी संगणमत करून फिर्यादी दिक्षीत फसवणूक केली. फिर्यादींच्या हिस्स्याची शिवाजीनगर आणि पिंपरी वाघीरे-पुणे कॅनॉल रोड-साधु वासवानी चौक येथील जमीन मिळकतीची बनावट कागदपत्रे तयार करून त्याची तिस-या व्यक्तीला विक्री केली. त्यातून मिळालेला पैसा फिर्यादी यांना दिला नाही. मानकर, वर्तक आणि मुकुंद दिक्षीत यांनी जमिनीच्या विक्रीतुन मिळालेल्या रक्कमेचा गैरव्यवहार घेतला आणि फिर्यादीची कोटयवधी रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे फिर्यादी यांनी कोथरूड पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) खटके या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.