Bhosari : प्रियकराने दिले चटके, तर त्याच्या वडिलांनी केली बदनामी; तरुणीची पोलिसात धाव

एमपीसी न्यूज – तरुणीने प्रियकराला लग्नाबाबत विचारले असता त्याने तरुणीला शिवीगाळ व मारहाण करत चटके दिले. तिच्या घरात जबरदस्तीने जाऊन तिच्याशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच तरुणाच्या वडिलांनी नातेवाईकांमध्ये मुलीची बदनामी केली. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2014 ते एप्रिल 2019 या कालावधीत घडला.

अमित मोहन लाड, मोहन लाड (दोघे रा. कासारवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या पिता-पुत्राची नावे आहेत. याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे आरोपी अमित याच्याशी 2014 पासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे तरुणीने नाशिक फाटा कासारवाडी येथे अमितकडे लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने तरुणीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच त्याच्या दुचाकीची चावी लाइटरवर गरम करून गरम चावीचे तरुणीला चटके दिले. तरुणीने गाडीला धरले आहे, हे माहिती असताना देखील त्याने गाडीवरून तिला फरफटत नेले. यामध्ये तरुणी जखमी झाली.

त्यानंतर आरोपी अमित 13 एप्रिल रोजी तरुणीच्या घरी आला. त्याने तिच्याशी अश्लिल वर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच मोहन लाड यांनी देखील तरुणीला शिवीगाळ करत तरुणीच्या नातेवाईकांमध्ये तिची बदनामी केली. याबाबत तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.