Hinjawadi : किरकोळ भांडणातून बांधकाम कामगाराचा खून

एमपीसी न्यूज – कामगारांमध्ये किरकोळ भांडण झाल्यानंतर एका कामगाराचा गळा दाबून खून करण्यात आला. ही घटना म्हाळुंगे चौकाजवळ पुराणिक लेबर कॅम्प येथे गुरुवारी (दि. 2) रात्री घडली.

रवींद्र सोय (वय 21, रा. म्हाळुंगे, लेबर कॅम्प. मूळ रा. झारखंड) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सुपरवायझर गिरीधर उत्तम पेटाटे (वय 40, रा. पिंपळे निलख, ता. चाकूरकर, जि. लातूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिनेश महिमा प्रधान (वय 27, रा. लेबर कॅम्प, म्हाळुंगे. मूळ रा. मयूरभंज ओडिसा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र मूळचा झारखंडचा असून तो कामानिमित्त पुण्यात आला आहे. म्हाळुंगे चौकाजवळ पुराणिक बिल्डरच्या एका बांधकाम साईटचे काम सुरु आहे. त्या साईटच्या लेबर कॅम्पमध्ये रवींद्र राहत होता.

गुरुवारी दुपारी त्याचे त्याच्या बांधकाम कामगार सहका-यांशी भांडण झाले. त्यानंतर आरोपी दिनेश याने रवींद्रचा लहान टॉवेलच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. शुक्रवारी (दि. 3) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक नामदेव अंगज तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.