BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : इंद्रायणीथडीतील ग्रामसंस्कृतीत लहानथोर रमले पाटलाच्या वाड्यात आणि खिलारी बैलांच्या जोडीशी

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- भोसरी येथे भरवण्यात आलेल्या इंद्रायणी थडी या महोत्सवात जुन्या गावांचे दर्शन घडवणारी ग्रामसंस्कृती तंतोतंत साकारण्यात आली असून त्यात उभारण्यात आलेल्या पाटलाच्या वाड्यासमोर आणि ख-या बैलजोडीची हुबेहूब आठवण करुन देणा-या दमदार बैलांसमवेत फोटो काढण्यात लहानांपासून थोरांपर्यंत सगळे नागरिक रमले आहेत.

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अंतर्मुख करायला लावणारा ‘इंद्रायणी थडी’ हा ग्रामीण महोत्सव भरविण्यात आला आहे. हा महोत्सव भोसरीमधील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर ८ ते ११ फेब्रुवारी दरम्यान सुरु असून यात ग्रामसंस्कृतीचे यथार्थ दर्शन घडवणारी गावजत्रा लहानथोरांचे आकर्षण ठरली आहे. यात जुन्या काळातील गावाचे रुप साकारण्यात आले असून जुन्या गढींमध्ये असणा-या नगारखान्याची आठवण करुन देणारे प्रवेशद्वार बघताच क्षणी जुन्या काळात घेऊन जाते. त्यानंतर आत गेल्यावर तिथे गावगाडा साकारताना शाळा, , बैलगाडी, मधमाशीपालन केंद्र, पाटलाचा वाडा, भव्य आणि नक्षीदार देऊळ, बारा बलुतेदारांचे कारखाने हे सर्व बारकाईने मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतक-याचा खरा सखा असलेली खरीखुरी आणि नकली बैलजोडी देखील ठेवण्यात आली आहे. या बैलांशेजारी, त्यांच्या पाठीवर बसून फोटो घेण्यात लहानांसोबत तरुणाई आणि लहानग्यांचे वडीलसुद्धा रमून गेले आहेत. तशीच येथे खरी बैलगाडीदेखील ठेवण्यात आली आहे. त्यात बैलगाडीत बसून गावात गेल्याचा आनंद मिळवण्यात देखील लहानथोर गुंगले आहेत.

अशीच गर्दी होते ती तिथे साकारण्यात आलेल्या पाटलाच्या वाड्याच्या भव्य प्रवेशद्वारासमोर. एकेकाळी गावगाड्याचा केंद्रबिंदू असलेला पाटलाचा वाडा येथे उभारण्यात आला आहे. जुन्या काळातील मराठी चित्रपटांचा मुख्य विषय असलेला पाटलाचा वाडा येथे दिमाखात उभा आहे. त्या वाड्याच्या प्रवेशद्वारापाशी सेल्फी घेण्यात आणि मित्रमंडळींसमवेत फोटो काढण्यात तरुणाई रमली आहे. तसेच येथे असलेल्या भव्य आणि नक्षीदार मंदिरात सतत वादनाचा कार्यक्रम सुरु असतो. शाहिरी, संबळवादन, दाक्षिणात्य शैलीतील वादन येथे सतत सुरु असते. कानावर पडणारे हे सूर येथे येणा-या लोकांना निश्चितच आपल्या गतस्मृतींमध्ये घेऊन जात असतील. जु्न्या ग्रामसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला डोक्यावर मोरपिसांची टोपी घातलेला वासुदेव येथे चिपळ्या वाजवत लोकांना गुन्या काळात घेऊन जातो. एकेकाळी गावगाड्याचे अविभाज्य भाग असलेले हे सर्व घटक आपल्याला जुन्या काळात नक्कीच घेऊन जातात. आणि स्मरणरंजनात रमवतात.

HB_POST_END_FTR-A4

.