Birthday wishes to Bhoomi Pednekar : यंदा वाढदिवस स्पेशल असेल, कारण तो आई बहिणीसोबत साजरा करणार

This year the birthday will be special

एमपीसी न्यूज – ‘दम लगा के हैशा’ या वेगळ्या चित्रपटामुळे आपल्या अभिनय कौशल्याची छाप पहिल्याच चित्रपटात पाडणा-या भूमी पेडणेकरचा आज वाढदिवस. तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भूमी ही एक नव्या उमेदीची अभिनेत्री असून, तिची नेहमीच प्रशंसा होत असते. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ती यशराज बॅनरमध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. भूमीला पहिल्या ‘दम लगा के हैशा ’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचे ‘फिल्मफेअर’ मिळाले होते.

वाढदिवसाच्या सेलिब्रेशन बद्दल बोलताना भूमी म्हणाली, ‘या वेळी माझा वाढदिवस वेगवेगळ्या गोष्टींसाठी स्पेशल आहे. विशेष कारण म्हणजे या वेळी मी कुणालाच भेटू शकणार नाही. मी माझ्या कुटुंबीयांसोबत घरीच राहणार आहे. बर्थडे सेलिब्रेशन एकदम सिंपल आणि बेसिक असेल. माझी एवढीच इच्छा आहे की, या महामारीमुळे संक्रमित झालेल्या लोकांचे आयुष्य चांगले व्हावे, लस लवकर यावी हीच या बर्थडेची सर्वोत्कृष्ट भेट असेल. दरवर्षी माझा बर्थडे खूप उत्साहात साजरा केला जातो. माझ्या जवळच्या लोकांना मी कोणत्याही परिस्थितीत बोलावते. सगळे लाड करतात. बघून खूप छान वाटते. पण या वेळी मी फक्त माझ्या आई आणि बहिणीसोबतच घरी राहणार आहे. अर्थातच मी माझ्या चाहत्यांचे आशीर्वाद व्हिडिओ कॉल करून घेईन’.

भूमी पुढे म्हणाली की, ‘सध्या माझे आयुष्य खूप व्यग्र आहे. पण कुटुंबीयांसोबत वेळ घालवायला आवडते. सध्या शूटिंग आणि सेट्सला खूप मिस करतेय. कामही मिस करते. सगळे पहिल्यासारखे लवकरच सुरळीत होईल असे वाटते. लोक व्हायरससोबत जगायला शिकत आहेत. इतर क्रिएटिव्ह लोकांप्रमाणे मीही माझा वेळ काही रचनात्मक गोष्टी करण्यात घालवला. काही वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली. कुकिंग आणि घरकामात मदत केली. ध्यानधारणा केली. याव्यतिरिक्त खूप लिहिले आणि वाचनही केले. शिवाय मी या महिन्यात अनेक डिजिटल करारही केलेत. त्यामुळे या सर्व कामांमध्ये मी खूप बिझी होते’.

‘मागच्या चार महिन्यांपासून मी कुटुंबासोबत बराच वेळ घालावला. त्यामुळे काही नवीन पैलू जाणून घेता आले. जेवणापासून वाचनही आम्ही सगळे एकत्र करत होतो. माझी बहीण माझ्यापेक्षा जास्त काम करते याची मला जाणीव झाली. जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाले तेव्हापासून तिने कधीच कामातून ब्रेक घेतला नाही. फक्त नाष्टा आणि चहा पितानाच आम्हाला सोबत बसायला वेळ मिळत होता’.

‘लॉकडाऊनच्या काळात मी झूमच्या माध्यमातून स्क्रिप्ट ऐकली. हा खूप चांगला अनुभव होता. या माध्यमातून स्क्रिप्ट ऐकवणे तितकेच प्रभावी आहे. मला ही ऑनलाइन स्क्रिप्ट ऐकवण्याची पद्धत जास्त आवडली. यामुळे अनेक लेखकही त्यांच्या कामात व्यग्र असतील. खरे तर पूर्वीचे दिवस लवकर परत येतील हीच प्रार्थना करते. आम्हाला तर या वातावरणातही काम करणे गरजेचे आहे. मला सेटवर जाऊन लवकर कामाची सुरुवात करायची आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचा विचार करुन मला वाईट वाटते. काम बंद असल्यामुळे त्यांचे जास्त हाल झालेत’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.