Ashok kumar – Kishor kumar : अवलिया बंधुजोडी – अशोककुमार-किशोरकुमार

एमपीसी न्यूज (हर्षल आल्पे): आज एक विचित्र योगायोग (Ashok kumar – Kishor kumar) आहे, सुप्रसिद्ध अभिनेते अशोककुमार यांची जयंती आहे. तर, त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना त्यांच्या धाकट्या भावाचा म्हणजेच किशोर कुमार गांगुली यांचा स्मृतिदिन आहे.

एक किस्सा या निम्मिताने आठवतो, अशोक कुमार अर्थात दादामुनी एकदा एका स्टुडियोमध्ये काही कामानिमित्त आलेले असताना, आणि ते काम झालेले असताना जाताना एक सुरेल आवाज त्यांच्या कानावर पडतो, ते विचारतात ‘हा कुणाचा आवाज आहे? याच्या आधी तर हा आवाज कधी ऐकला नव्हता’ तो संगीतकार सांगतो ‘आहे एक, तुमच्याच गावचा आहे, आणि योगायोग म्हणजे गांगुलीच आहे.”

दादामुनी त्या सुरील्या गायकाला भेटायला उत्सुकता दाखवतात, आणि त्वरित त्या स्टुडियोत परत जातात. ते जाऊन पाहातात तर काय? तो सुरीला गायक दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात त्यांचा सख्खा धाकटा भाऊ किशोर त्याना माईक समोर सुरेल गाताना दिसला. आणि अशोक कुमार भावूक झाले. कोणे एकेकाळी ज्याचा बोलण्याचा आवाज सुद्धा आपल्याला ऐकवायचा नाही तो किशोर आज एवढा सुरेल गातोय?

यावर त्यांचा क्षणभर विश्वासच बसेना. मधल्या काळामध्ये (Ashok kumar – Kishor kumar) म्हणजेच जेव्हा किशोरदा मोठे होत होते. तेव्हा दादामुनी हे मुंबईत कामासाठी होते, तर बाकी कुटुंब हे गावीच असायचे. त्यामुळे अशोक कुमार यांना किशोरकुमार बद्दल, त्यांच्या प्रगतीबद्दल काहीच ठाऊक नव्हते, अचानक व्यवसायिक दृष्ट्या मोठ्या मंचावर चांगल्या फिल्मसाठी गाताना बघून मोठा भाऊ म्हणून त्यांचा उर अभिमानाने भरून आला.

या दोन खरया अर्थाने कलाकार असणारया दोन बंधुंबद्दल अजून एक किस्सा वाचनात आला. गायक म्हणून प्रस्थापित होत असणाऱ्या किशोर कुमार यांना अभिनयात साक्षात अशोक कुमार यांनीच ओढले. किशोरकुमार याना एकूणच अभिनयाबद्दल तसा तिटकारा होता. कारण काय तर अभिनयात खोटे खोटे वागावे लागते. मनातला खरेपणा दाबून टाकावा लागतो. त्यापेक्षा गाण्यात मनातला खरेपणा आपण जपू शकतो.

Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 8 – मधुबाला एक दैवी देणं

संगीतात सच्चेपणा असतो, तर अभिनयात बेरकीपणा अपेक्षित असतो आणि तो आपल्याला आवडत नाही, असे किशोर कुमार नेहमी सांगायचे. पण, मोठ्या भावाची आज्ञा कशी मोडणार? म्हणून त्यांनी नाईलाजास्तव अभिनयात पदार्पण केले. आजकालच्या भाषेत सांगायचे तर त्यांचे लॉन्चींग फारच विनोदी प्रसंगाने झाले. म्हणजे जवळजवळ त्यांच्या आयुष्यातला पहिला शॉट हा सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत आला असता, ऐनवेळी अशोक कुमारांनी चतुराईने संकलकाकडून किशोर यांचा आवाज म्युट करून टाकला, जेणेकरून ते काय बोलत आहेत ते कळूच नये, प्रसंग असा होता, की त्या चित्रपटाचा हिरो हा एका शेतातून गाणे गात मनमुराद बागडतोय, तो शेताच्या एका भागातून धावत सुटतो आणि तिथेच एक व्यक्ती कडेला खाली बसलेला असतो, हिरोच्या धावण्यामुळे ती व्यक्ती करत असलेल्या स्वच्छतेतून डिस्टर्ब होते आणि उठून हिरोच्या दिशेने शिव्या देऊ लागते.

जेव्हा दिग्दर्शक म्हणून अशोक कुमारांनी किशोरला (Ashok kumar – Kishor kumar) हा प्रसंग समजावून सांगितला. तेव्हा प्रत्यक्ष हा प्रसंग चित्रित होत असताना किशोर कुमार यांनी अस्सल शिव्या दिलेल्या होत्या. एडीट टेबलवर जेव्हा हा प्रसंग बघितला गेला, तेव्हा सगळ्यांचीच हसून हसून बोबडी वळली. किशोर कुमार यांचा पहिला अभिनेता म्हणून दिलेला संवाद एडीट झाला. पण, त्यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे त्यांना त्यानंतर अभिनयाच्या खूप संधी चालून आल्या, आणि त्यांनीही मिळालेल्या संधीचे सोनेच केले. ‘चलती का नाम गाड़ी’सारखा अजरामर चित्रपट तर आजही रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकतो.

ज्या दोन भावांनी चित्रपटसृष्टीची मनापासून सेवा केली आणि आपल्या आयुष्यात चार चांगले आनंदाचे, करमणुकीचे क्षण आणले त्या दोन अवलिया भावांना म्हणजेच किशोर कुमार आणि अशोक कुमार या दोघांनाही हा मानाचा सलाम.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.