Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 8 – मधुबाला एक दैवी देणं

एमपीसी न्यूज : तिचे आरसपानी (Shapit Gandharva) सौंदर्य म्हणजे आपल्या हिंदीच नव्हे, तर समस्त सिनेसृष्टीला पडलेले एक सोनेरी स्वप्न होते. तिचे टपोरे डोळे कितीही कठोर तपश्चर्या करणाऱ्या ऋषीला बेचैन करणारे होते, अन् वरती तिच्या अतिशय लोभस चेहऱ्यावरचे ते जादुई हास्य.
उफ्फ! मधुबाला म्हणजे खरोखरच एक दैवी देणं होती. परमेश्वराने कुणास ठाऊक कुठल्या मंतरलेल्या क्षणी आपल्या दरबारातले एक मानाचे रत्न त्याच्याही नकळत पृथ्वीतलावर पाठवले. पाठवले खरे, पण अगदीच अल्पकाळासाठी. कदाचित त्याला आपण पृथ्वीतलावरच्या मर्त्य लोकांवर जास्तच कृपादृष्टी केलीय, याची जाणीव उशिरा झाली असावी. तो लगेचच जागा झाला आणि त्याने त्या चुकीचे परिमार्जनही केले. म्हणूनच या शापित गंधर्वाला नव्हे, तर पूर्वजन्मीच्या कुठल्या तरी अप्सरेला त्याने लगेचच आपल्याकडे बोलावून घेतले.
ती जगली अवघे 36 वर्षे. जणू ती इथली नव्हतीच. इथे नसेलही तिने अहंकार जपला; पण कदाचित स्वर्गात कळत-नकळत तिने एखादा अक्षम्य गुन्हा केला असेल. त्याची शिक्षा म्हणून तिला पृथ्वीवर धाडण्यात आले असेल. तिचा तिथला तो गुन्हा आपल्या मर्त्य माणसांसाठी मात्र वरदान ठरला आणि हे स्वर्गीय दरबारातले अलौकिक रत्न आपल्यासारख्या मर्त्य लोकांसाठी ‘अजि म्या ब्रम्ह पाहिले’ अशी अलौकिक अनुभूती देऊन जसे आले. तसेच, लवकर निघूनही गेले. प्रचंड दुःख, एकटेपण, माणसाच्या स्वभावातला हेकटपणा, स्वार्थ सर्व काही अनुभवून आपल्या अल्पकाळाच्या शापाचे सर्व दुष्परिणाम भोगून ती निघून गेली. पण, तिचे गूढ आजही तिच्या जाण्याच्या 60 वर्षांहूनच्या अधिक काळानंतरही तसेच अनाकलनीय आणि लोभसही आहे.
मधुबाला उर्फ मुमताज बेगम म्हणजे 1945 ते 1964 च्या काळातले एक अफाट, अद्भूत पण अलौकिक असे व्यक्तित्व. समस्त हिंदी सिनेसृष्टीवर अवघ्या काहीच वर्षात राज्य करून ती फारच लवकर जन्नतला निघूनही गेली; पण तिने ती होती तोवर आणि तिच्या जाण्याच्या 60 वर्षांनंतरही आपल्या सौंदर्याचा, नावाचा, कीर्तीचा, यशाचा आणि दुःखाचाही महिमा इथे ठेवून गेली.
परमेश्वराने तिला फक्त 36 वर्षांचे आयुष्य दिले. त्यातली दहा वर्षे तर बालपणातली. उरली 26 वर्षं. त्यातली अखेरची पाच-सहा वर्षं आजारपणात गेली. म्हणजे एकूण उरली किती तर 20 वर्षे. बरं,आतासारखे प्रगत तंत्रज्ञान पूर्वी नव्हते. एकेक चित्रपट तयार व्हायला वर्षानुवर्षे लागायची. तिने किती चित्रपटांत काम केले? फार नाही. म्हणजे विचार करा. तिची एकंदरित कारकीर्द, त्यातले यश आणि ते सर्व उपभोगायचा काळ आला, तर वयाच्या तिशीतच तिला दुर्धर आजाराने गाठले. गेलीच ती त्यानं बिचारी…कायमची सुटली.
तिचा जन्म एका पारशी मुस्लिम कुटुंबात 14 फेब्रुवारी 1933 साली दिल्लीत झाला. तिच्या आईचे नाव आयेशा बेगम तर वडिलांचे नाव अत्ताउल्ला खान. तिला एक-दोन नाही तर तब्बल 11 भावंडे होती. त्यातली 4 तर बाल्यावस्थेत असतानाच देवाघरी गेली. इतक्या मोठ्या खटल्यातले जीवन म्हणजे बालपणापासूनच भाळावर संघर्ष लिहिलेला. त्यातच ती आठ वर्षांची असताना तिच्या वडिलांनी दिल्ली सोडून मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला.
तिचे वडील अतिशय कर्मठ होते. ते एका तंबाखूच्या कंपनीत नोकरी करत होते. असे म्हणतात, की मधुबालाला जन्मतःच हृदयविकाराचा आजार होता. (ventricular  septal) आणि दुर्दैवाने त्यावर त्याकाळी काहीच इलाज नव्हता. त्याकाळच्या मुस्लिम प्रथेनुसार तिच्या वडिलांनी मुलींना शिक्षण घेऊ दिले नव्हते. तिच्या आईने अनेक मौलवी, हकीम यांना मधुबालाच्या आजाराविषयी दाखवले होते. असे म्हणतात, की एका फकीराने तिच्या आईला असे सांगितले होते, की तुमची मुलगी अतिशय यशस्वी होईल आणि नावलौकिक मिळवेल; पण ती वैयक्तिक आयुष्यात खूप दुःखी आणि एकटी असेल, तसेच ती अल्पायुषीही असेल. यात काय खरे काय खोटे हे तो अल्लाच जाणे.
पण, नंतर मात्र घडले ते अगदी हेच. बालपणी (Shapit Gandharva) तिला शालेय शिक्षण मिळाले नसले, तरी तिच्या अब्बूंनी तिला हिंदी आणि उर्दू घरच्या घरीच पण चांगली शिकवली. कसे कुणास ठाऊक पण मधुबालाला मात्र बालपणापासूनच फिल्मी दुनियेचे प्रचंड आकर्षण होते. तिला कधी काळी एखादा चित्रपट पाहायला मिळालाच, तर त्यातल्या पात्रांची नक्कल आणि अगदी तसेच नृत्य ती आपल्या अम्मीला करून दाखवत असे.
तिच्या वडिलांना हे जराही आवडत नसले, तरी तिने अगदी बालपणापासूनच चित्रपटात काम करायचे हेच ध्येय डोळ्यांपुढे ठेवले होते. त्यातच तिच्या वडिलांची दिल्लीतली नोकरी गेल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट आले आणि यातून त्यांना सावरले ते फक्त 7 वर्षांची असलेल्या त्यांच्या या लेकीने. तिला दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रावर खुर्शीद अनवर यांच्या कविता सादर करण्याचे काम मिळाले. याच दरम्यान तिथे होते ‘बॉम्बे टॉकीज’ या त्या काळच्या प्रसिद्ध स्टुडिओचे महाप्रबंधक चुन्नीलाल. त्यांनी मधुबालाचे  उज्ज्वल भविष्य ओळखले आणि तिच्या वडिलांना मुंबईत जा असे सांगितले.
विशेष म्हणजे तिच्या अब्बूंनी ते ऐकलेही. योगायोगाने तिला मुंबईत जाताच ‘बसंत’ नावाच्या एका चित्रपटात बाल कलाकार म्हणून 150 रुपयांच्या करारावर काम मिळाले आणि त्यातही विशेष बाब ही की हा चित्रपट चांगलाच यशस्वी सुद्धा ठरला. तिने ‘बेबी मुमताज’ म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले. याच दरम्यान तिला बॉम्बे टॉकीजच्या मालकीणबाई आणि अभिनेत्री देविकाराणी यांनी बघितले. मुमताजचे काम बघून त्या खूप प्रभावित झाल्या. त्यांनी तिचे नाव बदलून ‘मधुबाला’ ठेवले. मात्र, बेबी मुमताजची मधुबाला होण्याआधी तिचा संघर्ष खूप खडतर होता.
बसंतनंतर तिला लगेचच चित्रपट मिळाले नाहीत; पण तिच्या नशिबात ‘रंजीत मूव्हीटोन’ ही संस्था आली, जिच्या माध्यमातून तिने बेबी मुमताज या नावाने पुढे पाच चित्रपटांत काम केले. मुमताज महल, धन्ना भगत, राजपुतानी, फुलवारी आणि पुजारी. यातल्या ‘फुलवारी’ चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान तिला रक्ताची उलटी झाली; पण एकंदरितच हलाखीची परिस्थिती आणि अडचणींमुळे तिला स्वतःवर फारसे उपचार करून घेता आले नाहीत. यानंतर आलेल्या ‘नीलकमल’ या चित्रपटाने मात्र तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. यात तिच्या बरोबर सहकलाकार होते, राज पृथ्वीराज कपूर आणि बेगम पारा.
हा चित्रपट चांगलाच चालला (Shapit Gandharva) आणि तिचे नाणे चलनी बनले. त्यानंतर चितोड विजय, दिल की राणी आणि अमर प्रेम हे चित्रपट आले. यातल्या अमरप्रेमच्या यशानंतर दिग्दर्शक मोहन सिन्हा यांनी तिला मधुबाला या नावानेच काम करावे हा सल्ला दिला. यानंतर तिने लाल दुपट्टा, पारस, सिंगार अशा चित्रपटात सहनायिका म्हणून काम केल्यानंतर तिला ज्येष्ठ दिग्दर्शक कमाल अमरोही यांनी अशोककुमार बरोबर एका चित्रपटात घेतले. हा चित्रपट 1951 साली प्रदर्शित झाला आणि त्याने इतिहास घडवला.
त्या चित्रपटाचे नाव होते ‘महल’. यातले तिच्यावर चित्रित झालेले आणि त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झालेले गीत होते-आयेगा आनेवाला, जे गायले होते लता मंगेशकर यांनी. झोका घेत ती जेव्हा पडद्यावर झळकली, तेव्हा अनेकांच्या काळजात एक वीज चमकली होती आणि ती जणू सांगत होती- हिंदी सिनेमासृष्टीत नवी पण अतिशय सुंदर आणि सशक्त अभिनय करणारी सुपरस्टार आली आहे. यानंतर तिने पुढे काही यशस्वी चित्रपटांत काम केल्यानंतर तिची जोडी ऑनस्क्रीनवर जमली ती ‘दिलीपकुमार’ या सुपरस्टार सोबत. त्यांचा ‘तराना’ हा चित्रपट चांगलाच गाजला. यानंतरही तिचा संघर्ष संपला नाही. चढ-उतार तिच्या पाचवीलाच पुजले होते. नंतर आलेल्या काला पानी, हावडा ब्रिज, मिस्टर अँड मिसेस 55, फागुन, चलती का नाम गाडी- या चित्रपटांच्या यशाने मात्र तिच्या अभिनय क्षमतेवर आणि सौंदर्यावर दुनिया दिवाणी झाली होती.
यश, पैसा, नावलौकिक आता तिच्याकडे जणू बटीक झाले होते. यानंतर आलेल्या 1960 सालच्या ‘मुगल-ए-आज़म’ या सुपरहिट चित्रपटाने तिला आणखीन स्थैर्य आणि नावही मिळवून दिले. यातला तिचा अभिनय, दिलीपकुमार आणि पृथ्वीराज कपूर हे दोन महान अभिनेते सोबत असूनही सर्वांच्याच चिरकाल लक्षात राहिला ‘जब प्यार किया तो डरना क्या’ या गाण्यातला तिचा मुद्राभिनय आजही मनाचा ठाव घेतो.
याच दरम्यान ती दिलीपकुमार यांच्या प्रेमात पडली. दोघांचे लग्नही होणार आहे, अशी एकच चर्चा त्यावेळी सर्वत्र होती. पण, दुर्दैवाने याच चित्रपटाच्या दरम्यान तिची आणि दिलीपकुमारची सात वर्षे जुनी असलेली मैत्री संपुष्टात आली. त्यांनी साखरपुडाही केला होता, अशा बातम्या त्याकाळी खूप चर्चिल्या गेल्या होत्या. या धक्क्याने ती खचली. त्यातच तिचा जन्मजात आजारही बळावला. त्यामुळे तिला सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. शरीरासोबत ती मनानेही खचली होती. याच वेळी तिच्या आयुष्यात किशोरकुमार आला आणि त्याने तिला लग्नाची मागणी घातली.
दिलीपकुमारच्या नकाराने दुखावलेल्या मधुबालाने त्याला होकार देत त्याच्यासोबत निकाह केला. त्यांच्या ‘झुमरू’ या चित्रपटाने चांगले यश मिळवले होते. त्याशिवाय तिचे बॉयफ्रेंड, हाफ तिकीट, पासपोर्ट हे चित्रपटही आले. लग्नानंतर मात्र तिची तब्येत आणखीनच बिघडली. दुर्दैवाने मेडिकल सायन्स त्यावेळी आजच्या इतके आधुनिक नव्हते. त्यामुळे तिचा आजार आणखी बळावत गेला. 1969 साली तिला कावीळ झाली. त्यातून ती सावरलीच नाही आणि अखेर 23 फेब्रुवारीच्या सकाळी साडेनऊच्या सुमारास ती हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शरीराच्या आणि मनाच्या सर्व यातनांतून मुक्त झाली. वयाच्या फक्त 36 व्या वर्षी तिने इहलोकीचा निरोप घेत आपल्या निजधामाकडे कायमस्वरूपी प्रस्थान केले.
तिने जरी जगासमोर ठामपणे म्हटले होते की, ‘प्यार किया तो डरना क्या’; पण ज्याच्यावर तिने निस्सीम आणि मनोभावे प्रेम केले होते, त्याने मात्र तिच्यासोबत चालणे कबूल केले नाही. हा धक्का तिला सहन झालाच नाही. ज्यामुळे तिने अकालीच exit घेतली. तिने खूप दानधर्म केला असे म्हणतात; मात्र तिने ते कायम गुप्त ठेवले. तिच्या मृत्यूनंतर मात्र तिला त्याकाळच्या मोठमोठ्या नियतकालिकांत अभूतपूर्व प्रसिद्धी मिळाली. हीच दुनियेची असली रीत आहे.
तिच्या आयुष्यात (Shapit Gandharva) आलेल्या प्रत्येकाने तिच्यापासून फायदाच करून घेतला. ती मात्र तिच्याकडे जे होते, ते सर्व मुक्त हस्ते उधळत गेली. अखेर परमेश्वरालाच तिच्यावर केलेल्या अन्यायाची जाणीव झाली आणि त्याने सर्व प्रकारच्या व्याधीतून तिची सुटका करत आपल्याकडे बोलावून घेतले.
एक अप्रतिम सौदर्यवती, चांगली (Shapit Gandharva) अभिनेत्री, मोहक हास्याची मल्लिका अन् एक शापित परी हीच ओळख आजही तिची आहे. परमेश्वराच्या या अद्भूत रसायनाला भावपूर्ण श्रद्धांजली!
– विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.