Shapit Gandharva : शापित गंधर्व-भाग 49 – दुखापतीचा बळी-प्रवीणकुमार

एमपीसी न्यूज – त्याच्याकडे चांगला वेग होता,विकेट्स घेण्याची क्षमता होती, तो उत्तम फलंदाज होता, चांगला क्षेत्ररक्षकही (Shapit Gandharva) होता. एक दिवसीय क्रिकेट सामन्यात त्याने पदार्पणातच निर्धाव षटकात टाकत एक अनोखा विक्रम केला होता. त्याच्या रूपाने भारतीय क्रिकेटला चांगला खेळाडू भेटला आहे, आणि तो खूप दीर्घकाळ भारतीय संघाची सेवा करु शकेल असेच सर्वांना वाटत होते. मात्र आपल्याबद्दलच्या अपेक्षा पूर्ण करण्यात तो सपशेल अयशस्वी ठरला. तो आला तो जिंकला अन तो लगेच विस्मरणात गेला. असे ज्याच्याबाबत म्हणता येईल असा हा अतिशय गुणवंत पण शापित गंधर्व म्हणजेच अष्टपैलू प्रवीणकुमार.

क्रिकेट हा खेळ खरे तर गोऱ्या साहेबांनी जगाला दिलेला, पण 130 करोड लोकसंख्येच्या भारत देशात तो प्रचंड लोकप्रिय झाला. त्यात 1983 साली महान अष्टपैलू कपिलदेव निखंज यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चमत्कार करत विश्वकप जिंकला अन भारतात सर्वानाच जणू क्रिकेटज्वर जडला. यानंतर 1989 साली एका सुशिक्षित पण सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातून (Shapit Gandharva) आलेल्या वंडरबॉय सचिनने देशाचे प्रतिनिधित्व केले ,अन पुढे बघताबघता या खेळात विक्रमाचा एव्हरेस्ट रचत हा खेळ सर्वसामान्यांत सुद्धा प्रचंड लोकप्रिय केला.

यातूनच प्रेरणा घेत अनेकांनी या खेळात करियर करण्याचे ध्येय डोळ्यापुढे ठेवले आणि त्यात खूपसे खेळाडू यशस्वी ठरले. त्यांना बघून हा भावी अमका , हा भावी तमका असे कल्पनेचे मनोरे रचणाऱ्या असंख्य रसिकांना अनेकदा  वाटले. त्यातले काही अंशीच खेळाडू हा कल्पनाविलास सत्यात उतरवण्यात यशस्वी ठरले  तर बरेचसे अपयशी. असाच एक भारतीय संघाला भावी कपीलदेव सापडला आहे असे ज्याला बघून वाटायला लागले होते तो म्हणजे प्रवीणकुमार उर्फ पी.

 

PCMC : सकस आहारासाठी महापालिका मोजणार सव्वा दोन कोटी

2 ऑक्टोबर 1986 रोजी उत्तरप्रदेश मधल्या शाहिल जिल्ह्यातील लपराना या गावी एका पहिलवान जाट कुटुंबातील प्रवीणकुमारचे वडील सकटसिंग खाईवाल स्वतः एक उत्तम पहिलवान होते आणि ते उत्तरप्रदेश पोलीस दलात हेड कॉन्सटेबल म्हणून काम करत होते. तर त्याची आई मुर्ती देवी एक गृहिणी होती. त्याच्या घरातले बरेचसे सदस्य कुस्तीगीर होते. थोडक्यात काय त्याच्या घरातच खेळाबद्दल चांगलीच (Shapit Gandharva) रुची होती. याविपरीत प्रवीणला मात्र क्रिकेटबद्दल प्रचंड आकर्षण होते. घरच्यांनीही त्याला यासाठी प्रोत्साहनच दिले. वयाच्या 14 व्या वर्षापासूनच त्याने क्लब क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अन अंगभूत प्रतिभेच्या जोरावर त्याने  पुढील 5  वर्षाच्या आतच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करून आपले भवितव्य उज्ज्वल आहे असे  जणू अधोरेखित केले.2005/6 च्या रणजी हंगामात अष्टपैलू कामगिरी करत सर्वानाच प्रभावित केले. त्याने या हंगामात 41 बळी आणि 386 धावा करताना चार वेळा 5 वा त्याहून अधिक बळी एका डावात घेण्याची मोठी कामगिरी केली.  एक वेळा एका सामन्यात दहा बळी घेवून आपला दमखम दाखवला.

मधल्या फळीत फलंदाजी करताना त्याने 3 वेळा अर्धशतकी खेळी करत आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले.पुढच्या मोसमात तर त्याने 49 बळी मिळवून आपल्या कामगिरीत उत्तम सातत्य ठेवले ज्याचे बक्षीस म्हणून त्याची 2007 साली झालेल्या पाकिस्तान दौऱ्यासाठी त्याची मुख्य भारतीय संघात निवड झाली. याच दौऱ्यात जयपूर येथील अखेरच्या सामन्यात त्याने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि या सामन्यात पहिलेच षटक  निर्धाव टाकून सर्वानाच प्रभावीत केले. यानंतर त्याची ऑस्ट्रेलियन संघांविरुद्ध निवड झाली. ज्यात त्याने 4 सामन्यात 10 बळी मिळवले. व्ही बी कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने भेदक गोलंदाजी करत 4 बळी मिळवले . ज्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच घरात पराभूत करुन व्ही बी कप पटकावण्याचा भीमपराक्रम केला होता.

यानंतर त्याने पुढील मोसमातही अशीच धडाकेबाज कामगिरी करून आपले संघातले स्थान बर्यापैकी पक्के केले होते. झहीर खान आणि आशिष नेहरा सोबत त्याची चांगलीच जोडी जमली होती. त्याच्या रूपाने भारतीय संघ एक चांगला अष्टपैलू खेळाडू मिळवण्यात यशस्वी ठरलाय असे बऱ्याचशा मोठमोठ्या समीक्षकांही वाटायला लागले होते. त्याची 2011 च्या विश्वकप स्पर्धेसाठी (जो भारताने 28 वर्षांनंतर जिंकलाही होता) संघात निवडही झाली होती, पण नेमकी स्पर्धा सुरू व्हायला अन त्याला जायबंदी व्हायला एकच गाठ पडली,अन त्या विजयी विश्वकप संघाचा भाग होण्याची त्याची संधी हुकली. त्यानंतर त्याला दुखापतीनेही त्रस्त  करायला सुरुवात केली अन त्याने तो संघाबाहेर फेकला गेला तो कायमचाच.

68 एकदिवसीय सामने खेळलेल्या प्रवीणकुमारने 6 कसोटीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले,ज्यात त्याने 27 बळी घेतले . यातल्या 15 इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने मिळवल्या होत्या. यात त्याने एकदा 5 बळी ही एका डावात मिळवले होते. पण त्याची कसोटी कारकीर्द अतिशय छोटी ठरली. त्याला कारणीभूत ठरली त्या त्याची दुखापत. जलदगती गोलंदाज आणि दुखापती यांचे नाते फारच घट्ट असते. भारतीय संघात एकदा स्थान मिळाले की आयुष्याचे सोने (Shapit Gandharva) होते ,हे माहिती असल्याने संघात स्थान मिळाले की ते टिकवण्यासाठी खूप धडपड करावी लागते ,मग जायबंदी झालोत हे समजले तरी पण याचे दुष्परिणाम किती भयंकर हे ज्याच्यावर येते त्यालाच कळते.

भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात चाहत्यांच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे खूपच मोठे असते. त्या पुर्ण करण्यात कधी न कधी अपयश आले तर इथल्या रसिकांनी सचिन तेंडुलकर पासून कपिलदेव कोणालाही सोडले नाही. प्रवीणकुमारकडूनही अशाच अवास्तव अपेक्षा बाळगल्या गेल्या. त्या पुर्ण करण्यात तो यशस्वी ठरला नाही. त्यात दुखापतीने त्याला आणखी हताश केले. असे म्हणतात की तो  प्रचंड वैफल्यग्रस्त झाला, इतका की त्याला यातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचार तज्ञाकडे जावे लागले.

खरे तर सचिन तेंडुलकर, कपिल देव,गावसकर ,लता मंगेशकर किंवा सर डॉन ब्रॅडमन सारखे व्यक्तिमत्त्व किंवा तसा साचा परमेश्वर एकदाच बनवतो, अन नंतर तो साचा कुठेतरी अडगळीत फेकून देतो. माझ्यासारख्या सामान्य माणसाला मात्र त्याने असे असंख्य तेंडुलकर ,ब्रॅडमन बनवत रहावे असे  वाटत राहते. कदाचित याच अपेक्षेचे ओझे  आपण नवोदित खेळाडूवर आपल्याही नकळत लादत राहतो. मैदानात प्रत्यक्ष खेळण्यापेक्षाही या अपेक्षेचे ओझे  घेवून खेळणे खूपच अवघड. कदाचित प्रवीणकुमारच्या बाबतीतही असेच झाले असावे. म्हणूनच त्याची प्रतिभा बघता त्याच्या कारकिर्दीचा अंत अकाली झाला (Shapit Gandharva) असावा,कदाचित…
बाकी “त्याची” मर्जी असेल तेच होते, हे नक्की.

या प्रतिभावंत खेळाडूचे उर्वरित आयुष्य आंनदी आणि सुखसमाधानी जावो, हीच परमेश्वराकडे प्रार्थना

-विवेक कुलकर्णी

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.