Chakan : चाकण आंदोलनाच्या नथीतून राजकीय तीर ? 

एमपीसी न्यूज – येथे 30 जुलै 2018 रोजी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले  होते. यावेळी शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आंदोलकांचे अटकसत्र सुरू आहे. खेडच्या आमदारांनी विधानसभेत लक्षवेधी मांडल्यानेच हिंसाचारात सहभागी असलेल्यांची धरपकड सुरु असल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रत्यक्षात अशी कुठलीही लक्षवेधी खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी मांडलीच नसल्याची बाब समोर आली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनीही अशी लक्षवेधी खेडच्या आमदारांनी  मांडल्या बाबत काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या संपूर्ण चाकणच्या आंदोलनाच्या नथीतून राजकीय तीर मारण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा होत आहे.

चाकण ( ता. खेड)  येथे 30 जुलै रोजी झालेल्या मराठा आंदोलनात घुसलेल्या काही असामाजिक प्रवृत्तींकडून झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आंदोलनानंतर लगेचच 30 जणांना व मागील महिनाभरात या घटनेची थेट संबंध असलेल्या आणखी तेरा जणांना अटक केली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी याबाबत सखोल तपासासाठी एसआयटी स्थापन केल्या नंतर आता प्रकाराच्या मुळाशी जाऊन सखोल तपास सुरु झाला आहे. त्यामुळे हिंसाचार प्रकरणात थेट संबंध असलेल्यांची व विविध ध्वनीचित्र फितींमध्ये हिंसाचार करताना दिसून आलेल्यांची पळापळ सुरु आहे.  मात्र यामध्ये निरपराध मराठा युवकांना त्रास होऊ नये अशी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची आणि समन्वयकांची भूमिका आहे.

संबंधित हिंसाचाराच्या घटनेच्या संदर्भात खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडल्याने हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी या विशेष तपास पथकाची स्थापना झाल्याचा आरोप काही जणांनी विविध माध्यमांतून केला आहे. मात्र अशी कुठलीही लक्षवेधी मांडण्यात आलेली नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या जिल्हा स्तरावरील पदाधिकारी असलेल्या काहींनी राजकीय हेतून असे आरोप केल्याची चर्चा खेड तालुक्यात शिवसेनेच्या गोटात व नागरिकांत सुरु आहे.

चाकण मधील मराठा आंदोलनात शिरलेल्या मराठा युवकांच्या व्यक्तिरिक्त अन्य असामाजिक प्रवृत्तींशी आंदोलनाचा काहीही संबध नसल्याचे यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनानेही कुठल्याही निरपराध मराठा आंदोलकांना कसलाही त्रास होणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. मात्र यामध्ये राजकीय पोळ्या शेकण्यासाठी अधिवेशनात लक्षवेधी मांडल्याचे आरोप सोशल व अन्य माध्यमांतून करण्यात येत आहे. प्रत्यक्षात अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच एसआयटीची स्थापना झालेली असल्याचे स्पष्ट असल्याने या आंदोलनाला आणि त्यातील असामाजिक प्रवृत्तींनी केलेल्या हिंसाचार प्रकरणाला आता  राजकीय रंग दिला जात असल्याची चर्चा चाकण सह खेड तालुक्यात सुरु आहे.

राज्यातील सर्व गुन्हे मागे घ्या : मनोहर वाडेकर  ( समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा)

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे कि, चाकण येथील आंदोलनात मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी सदरचा हिंसाचार घडवून आणण्यात आला. दंगलीत 6 ते 7 कोटी रुपयांचे झालेले मालमत्तेचे नुकसान दंगलीत झाले असा ठपका मराठा बांधवांवर ठेऊन अटक सत्र सुरु करण्यात आले आहे. राज्यभर असेच अटक सत्र सुरु असून  मराठा युवकांवर राज्यभरात दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे. प्रशासनाने या बाबत कार्यवाही न केल्यास 16 डिसेंबर पासून उपोषण करण्यात येणार आहे. खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी लक्षवेधी मांडली किंवा नाही याबाबत काहीही माहिती नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या प्रसिद्धी पत्रकात आमदार गोरे यांनी लक्षवेधी मांडल्याचा कुठेही उल्लेखच करण्यात आलेला नाही असे समन्वयक मनोहर वाडेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.