Bhosari News : चऱ्होली, वडमुखवाडी येथील स्विमिंग पूल उद्घाटनापासून कुलूप बंद, नागरिकांनी केले तलावावर आंदोलन

एमपीसी न्यूज : आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू तयार व्हावेत, आपल्या परिसरातच त्यांना स्विमिंगचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण मिळावे यासाठी पालिकेने चऱ्होली येथील सर्व्हे नं. 131 वडमुखवाडी येथे स्विमिंग पूल अर्थात जलतरण तलाव बांधला खरा, (Bhosari News) मात्र हा पूल गेल्या नऊ महिन्यांपासून कुलूप बंद अवस्थेत आहे. या विरोधात येथील महिलांनी आक्रमक होत थेट जलतरण तलावावर हल्लाबोल केला. या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगरसेविका विनया तापकीर यांनी केले.

याबाबत विनया तापकीर म्हणाल्या, शहराचा उद्योगनगरी म्हणून नावलौकिक आहे. पिंपरी-चिंचवड शहराला क्रीडानगरी म्हणून लौकिक मिळवून देण्याच्या दृष्टीने तसेच शहरातील खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहोत. जलतरणपटूंना दर्जेदार प्रशिक्षण घेण्यासाठी तसेच सराव करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराबाहेर जावे लागते. ही सोय याच शहरात उपलब्ध व्हावी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करीत आलो आहोत.

चऱ्होली येथील सर्व्हे नं. 131 वडमुखवाडी येथे स्विमिंग पूल अर्थात जलतरण तलावाचे आरक्षण होते. हे आरक्षण विकसित करण्यासाठी 2012 पासून मी पाठपुरावा करत होते. जागा ताब्यात घेणे त्यानंतर जलतरण तलावाचे आरक्षण विकसित करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, असे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर या पंचवार्षिकमध्ये हे काम सर्वार्थाने पूर्ण झाले. अत्यंत आकर्षक जलतरण तलाव नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आला. 62 गुंठे क्षेत्रात 16 बाय 25 आकाराचा जलतरण तलाव उभारण्यात आला आहे.ऑलिम्पिकच्या धर्तीवर हा सेमी ऑलिम्पिक जलतरण तलाव तयार करण्यात आला आहे. मात्र पालिकेच्या कारभारामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून हा जलतरण तलाव बंद आहे.

Pune News : भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी यंदा अधिक सुविधा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

चऱ्होली-वडमुखवाडीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज जलतरण तलाव हा नव्याने बांधण्यात आला आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता 7 लाख 11 हजार 280 लिटर इतकी आहे. त्यानुसार, सुमीत स्पोर्टस यांना या तलावाची साफसफाई, देखभाल-दुरूस्तीचे कामकाज देण्यात आले. (Bhosari News) संत ज्ञानेश्वर महाराज जलतरण तलावाच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरमहा 97020 खर्च मंजूर करण्यात आला आहे. मात्र जलतरण तलाव कुलूप बंद अवस्थेत आहे मग हा खर्च नेमका कशासाठी केला जात आहे, असा प्रश्न आंदोलनाच्या दरम्यान उपस्थित करण्यात आला.

आंदोलनाच्या दरम्यान नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा धिक्कार केला. ‘जलतरण तलाव चालू करा, नाहीतर खुर्च्या खाली करा,’ अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या. जलतरण तलाव बंद असल्याने मच्छर, माशा, चिलटे यांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे देखील यावेळी महिलांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.