Chinchwad News: तारांगण प्रकल्प 29 वर्षांसाठी सायन्स पार्कला चालविण्यास देणार

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड(Chinchwad News)येथील सायन्स पार्कजवळ उभारण्यात आलेल्या तारांगण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प सायन्स पार्कलाच चालविण्यास देण्यात येणार आहे. तारांगणाची 29 वर्षासाठी चालन, देखभाल-दुरूस्ती, तिकीटाचे योग्य दर ठरविण्याकरिता त्यांच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या प्रस्तावास मान्यता दिली.  

अंतराळ क्षेत्रात शहरातील विद्यार्थ्यांनी स्थान निर्माण करावे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभागही मोलाचा असावा, या उद्देशाने महापालिकेच्यावतीने चिंचवड येथील सायन्स पार्कजवळ  तारांगण प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून तो कार्यान्वित करणे बाकी आहे. अंतराळातील ग्रह-तार्‍यांविषयी असलेले कुतूहल, समज-गैरसमज, नानाविध कोडी उलगडून दाखविण्यासाठी तारांगण प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे. संपूर्णपणे वातानुकूलित असणार्‍या या तारांगणात 150 बैठक व्यवस्था असून 100 बैठक व्यवस्थेचे स्वतंत्र सभागृह आहे. याशिवाय, पुस्तक दालनाचाही समावेश आहे. हे तारांगण 15 मीटर व्यासाचे व गोलाकार असून त्याचा सांगाडा लोखंडी आहे. त्यावर आधुनिक काचेचे आवरण बसवण्यात आले आहे.

यामध्ये डीजिटल स्वरूपाचे तारांगण दाखवण्यात आले आहे. (Chinchwad News) पूर्ण लतामंडप उभारण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सर्व ग्रह, तारे, नक्षत्र पहावयास मिळणार आहेत. विविध लहान मोठे तारे तसेच ध्रृव तारा, नक्षत्र स्पष्टपणे पाहता येणार आहेत. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांचा अवलंब करण्यात आला आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात केला आहे. टप्पा एकमध्ये स्थापत्य आणि विद्युत विषयांचा तर टप्पा दोनमध्ये तारांगणासाठी आवश्यक प्रोजेक्टर, आतील डोम आदी कामांचा समावेश आहे.

या प्रकल्पात शालेय विद्यार्थ्यांसाठी तारामंडळ, ग्रह, तारे यांची माहिती मिळण्यासाठी व्हीडीओ-ऑडीओ फिल्म दाखविल्या जाणार असून त्यांचा कालावधी 30 मिनिटापर्यंत आहे. हा प्रकल्प विज्ञानाशी संबंधित असल्याने पिंपरी – चिंचवड सायन्स पार्क यांना चालविण्यास देण्याबाबत चर्चा करण्यासाठी 2 डिसेंबर 2022 रोजी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तारांगण प्रकल्प सायन्स पार्क यांना चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सायन्स पार्कच्या संचालक मंडळावर महापालिका आयुक्त अध्यक्ष आहेत. तसेच, इतर विविध क्षेत्रातील शास्त्रज्ञ हे संचालक आहेत. हा प्रकल्प पुढील 29 वर्षासाठी चालन, देखभाल-दुरूस्ती, तिकीटाचे योग्य व वाजवी दर ठरविणे, परिसरात मिटींग हॉल, प्रदर्शन हॉल, कॅन्टीन तसेच इतर परिसरातील सुविधा त्यांच्या मर्जीनुसार वापरण्यास देण्यासाठी सायन्स पार्कसमवेत करारनामा करण्यात येणार आहे. करारनाम्याच्या अटी-शर्ती ठरविण्यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखा परिक्षक, कायदा सल्लागार, सह शहर अभियंता, भूमी-जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. स्थायी समिती सभेत आणि महासभेत या प्रस्तावास मंजूरी देण्यात आली.

BJP : भाजपची आज मोठी बैठक; दोन दिवस चालणार चर्चा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.