Chinchwad : गणेश चतुर्थी निमित्त पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे पोलीस अंमलदारांना मोठे गिफ्ट; 394 अंमलदारांना मिळाली बढती

एमपीसी न्यूज – गणेश चतुर्थी निमित्त पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील 394 पोलीस अंमलदारांना (Chinchwad) पदोन्नती देत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मोठे गिफ्ट दिले आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी हे गिफ्ट मिळाल्याने पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 390 पोलीस शिपाई, नाईक ते हवालदार पदावर तर चार अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली आहे.

25 मे 2004 पूर्वी पोलीस दलात रुजू झालेल्या अंमलदारांना यावर्षी सेवाज्येष्ठतेनुसार बढती देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु होऊन पाच वर्ष उलटली आहेत. अजूनही आयुक्तालयाला मनुष्यबळाची कमतरता आहे. आजवर शहरात आलेल्या पाचही पोलीस आयुक्तांनी मनुष्यबळ वाढीसाठी प्रयत्न केले. दरम्यान पोलीस शिपाई पदावर दोन भरत्या देखील झाल्या. इतर जिल्ह्यातून बदलीवर येणारे अंमलदार, पोलीस भरती मधून मिळालेले अंमलदार अशांची मोट बांधून आयुक्तालयाचा गाडा हाकला जात आहे.

Pimpri : आचारविचार शुद्धतेच्या पाठीशी परमेश्वर उभा राहतो – अण्णा हजारे

आगामी गणेशोत्सव आणि इतर सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालयाला बाहेरून अधिकची कुमक मागवावी लागते. दरम्यान बंदोबस्तासह घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी देखील राखीव मनुष्यबळ ठेवावे लागते. असे असतानाच पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या 394 पोलीस अंमलदारांना आनंदाचा धक्का दिला. पोलीस शिपाई आणि नाईक पदावरून 390 जणांना हवालदार पदी बढती दिली आहे.

पोलीस दलात 30 वर्ष सेवा पूर्ण करणारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर किमान तीन वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या चार अंमलदारांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती दिली आहे. मुख्यालयात कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोज बनसोड, ज्ञानेश्वर पोटे, वाहतूक शाखेतील गजेंद्र जाधवर आणि वाकड पोलीस ठाण्यातील अरुण भालेराव यांना ही बढती मिळाली आहे.

पोलीस नाईक पद रद्द

पोलीस अंमलदारांना पदोन्नती साखळीमध्ये सामान्यतः पोलीस शिपाई-पोलीस नाईक-पोलीस हवालदार-सहायक पोलीस उपनिरीक्षक असह तीन पदोन्नतीच्या संधी मिळतात. सर्वसाधारपणे एका पदावर दहा वर्षे सेवा कालावधी झाल्यानंतर पदोन्नती मिळते. पोलीस शिपाई पदावर भरती झालेल्या अंमलदाराला पोलीस उपनिरीक्षक होण्यासाठी वयाच्या अडचणी येतात. त्यामुळे त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्णच (Chinchwad) राहते.

त्यामुळे पोलीस दलातील पदोन्नती साखळीतील अंमलदाराचे पोलीस नाईक हे पद रद्द केल्यामुळे अंमलदारांना आश्वासित प्रगती योजनेनुसार दहा वर्षानंतर पदोन्नतीने पोलीस हवालदार होता येईल. त्या अंमलदारांची 25 वर्ष सेवा पोलीस दलाकरीता गुन्हे तपासासाठी मिळेल, असा विचार करत गुह विभागाने फेब्रुवारी 2022 मध्ये पोलीस नाईक हा संवर्ग मृत संवर्ग म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेले पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक या दोन्ही संवर्गातील अंमलदारांना पोलीस हवालदार पदावर बढती दिली जात आहे.

पदोन्नती मिळालेल्या अंमलदारांचे अभिनंदन

पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक ते पोलीस हवालदार या पदावर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती करण्यात आली आहे. यामुळे गुन्ह्यांच्या तपासासाठी मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे, असे सांगत बढती मिळालेल्या अंमलदारांचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अभिनंदन (Chinchwad)  केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.