Chinchwad : अपरिहार्यपणे असणारी भावना भीती ‘द फियर फॅक्टर’

(विराज सवाई)

एमपीसी न्यूज- अठ्ठावन्नाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या सहाव्या दिवशी सादर झालं कलापिनी, तळेगाव दाभाडे यांचं ‘द फियर फॅक्टर’. या नाटकाचं लेखन अमेय उज्वल आणि दिग्दर्शन मोहन कुंटे यांनी केलं होतं. प्रत्येक सजीवाच्या जन्मापासून त्याच्याबरोबर अपरिहार्यपणे असणारी भावना म्हणजे भीती ! ब-याचदा ही भीती अनाठायी असते. तर कधी कधी मनाच्या कमकुवत अवस्थेत किंवा सुप्त मनात दडलेल्या ताण-तणावांमुळे ती अचानक आपलं डोकं वर काढते. ही गोष्ट आहे मुग्धा आणि नंदन या जोडप्यातील विकोपाला गेलेल्या संघर्षाची. हा संघर्ष दोघांच्याही मनाच्या अबोध पातळीवर घडतो.

नंदनवर प्रेम असल्यामुळे आई-वडिलांचा तीव्र विरोध पत्करून मुग्धा त्याच्याशी लग्न करते. नव्याचे नऊ दिवस चांगले गेल्यावर पुढे फुटकळ कारणांवरून त्यांच्यात वाद सुरू होतात. त्यात या लग्नामुळे मुग्धाचं माहेर कायमचं तुटलंय आणि नवरा सोडून तिला दुसरा आधार नाही हे ध्यानात येताच नंदन बदलतो. त्याच्या स्वभावातली विकृती या वादांमुळे उफाळून बाहेर येते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचा विस्फोट होणं अटळ असतं तसा नंदनच्या अत्याचारांचा दाब वाढत जाऊन मुग्धाच्या सहनशक्तीचा बांध एकदिवस फुटतो.

यानंतर कथा अनपेक्षित वळण घेत गर्द झाडीच्या अंधा-या वाटेला शिरते. नंदनच्या कारचा अपघात होतो आणि त्यात त्याचं शरीर विकलांग होतं. आता नंदन पूर्णपणे मुग्धावर अबलंबून असतो. शरीर दुबळं होऊऊनसुद्धा विचारशक्ती शाबूत असल्यामुळे अपघातापूर्वीचाच त्याचा विकृत स्वभाव पून्हा डोकं वर काढतो. पण मुग्धाला सतत एका दडपणाखाली ठेवणा-या नंदनला आता त्याची असहाय्य शारिरीक अवस्था केविलवाणी करून सोडते. याच परिस्थितीचा नकळतपणे फायदा घेत मुग्धा त्याचावर भयकारी सूड उगवते. मुक्ततेची जाणीव क्षणात भंग पावते आणि त्याचक्षणी सुप्तावस्थेत असलेली भीती मुग्धाच्या मनाच्या बाह्यपटलावर म्हणजेच रंगमंचावर अलगद प्रवेश करते. “शांत जलाशयाच्या पृष्टभागावर फेकलेला खडा जसा आपल्या स्पर्शागणिक अस्वस्थतेची असंख्य वलयं निर्माण करत संपूर्ण जलाशय व्यापून टाकतो तसंच माणसाच्या मनावर संभ्रमाचा एक स्पर्श भीतीची असंख्य वलयं निर्माण करत मानवी मन आणि बुद्धीच्या संपूर्ण अस्तित्वाला व्यापून टाकतो. आणि बाकी उरते ती फक्त भीती !” असं म्हणत मुग्धाच्या ताळतंत्रावर ताबा मिळवते.

तरीही हे सूडनाट्य नाही. हा विवेक-अविवेकाचा खेळ आहे. भीतीची बाह्य कारणं संपली तरी त्या भीतीची जागा दुसरी भीती घेते. त्यामुळे या ना त्या प्रकारे भीतीचं अस्तित्व कायमच माणसाच्या मनात राहतं. दिग्दर्शक मोहन कुंटे यांनी हे नाटक त्यांच्या शैलीने पूर्णपणे पेलून धरलं आहे. बारीक सारीक तपशीलांचा आणि हालचालींचा अंतर्भाव केला असल्यामुळे आणि लेखक अमेय उज्वल यांच्या तगड्या संहितेमुळे प्रयोग अत्यंत काळजीपूर्वक बघावा आणि ऐकावा लागतो.

विजय कुलकर्णी, माधुरी कुलकर्णी यांनी नंदन आणि मुग्धा या भूमिका आवश्यक त्या सर्व भाव-भावनांसहीत समर्थपणे उभ्या केल्या आहेत. मल्टीपल कास्टींग(एक भूमिका दोघांनी करायची) चा वापर करण्याची कल्पना भीतीच्या पात्रासाठी दोन भागांत सहेतुक आणि लाॅजिकला धरून मांडलेली असली तरी समन्वयाच्या आणि परस्परांच्या उर्जेचे गणित जुळून न आल्यासारखे वाटले. या भीतीची भूमिका विशाखा बेके यांनी प्रयत्नपूर्वक साकारली आहे. सायली रौंधळ यांनी त्यांना उत्तम साथ देण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या अंकातील डाॅक्टरच्या विषयाला पूरक असलेले पात्रातून नंदन आणि मुग्धा यांच्याविषयी त्यांच्या संवादांमधून प्रतित होत असलेली आपुलकी दाखवण्याचा आदित्य धामणकर यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केला आहे.

विनायक काळे,चेतन पंडीत यांची प्रकाशयोजना आणि वादिराज लिमये,शार्दूल गद्रे यांच्या संगीताचा सहभाग अभिनय आणि संहितेइतकाच नाटकाचा योग्य तो परिणाम बहाल करण्यात यशस्वी ठरला. दोन्ही अंकांच्या सुरवातीला नाटकाच्या कथेची झलक दाखवणा-या कंटेंपररी प्रकारातल्या नृत्यरचना विपूल परदेशी यांच्या दिग्दर्शनाखाली प्रणोती पंचवाघ,मुक्ता भावसार,ह्रितीक पाटील,अनुजा झेंड, चैतन्य जोशी यांनी प्रभावीपणे सादर केल्या. आदित्य धामणकर, चेतन पंडीत यांनी नेपथ्य विचारपूर्वक केले आहे. मुक्ता भावसार, पूजा कडवे यांच्या रंगभूषेने महत्वाची भूमिका बजावली आहे. असं हे ‘द फियर फॅक्टर’ हे नाटक एखाद्या ख्याल गायकाप्रमाणे तब्येतीत सादर झालं. प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद या नाटकाला मिळाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.