Pune : पुण्यात थंडीचा कडाका वाढणार

एमपीसी न्यूज – राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने गारठा पुन्हा वाढत आहे. नागपूर येथे तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंशांनी घट होत राज्यातील नीचांकी 12 अंश तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. बुधवारपर्यंत (28 नोव्हेंबर) राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून किमान तापमानात घट होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

पावसाला आवश्‍यक पोषक हवामान निवळून गेल्याने राज्यात निरभ्र वातावरण आहे. यातच अरबी समुद्र आणि परिसरामध्ये असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तरेकडील थंड हवा दक्षिणेकडे येऊ लागली आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी तापमानात घट झाली असून धुके पडत आहे. नागपूरपाठोपाठ पुण्यातही रविवारी 14.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. कोकण वगळता सर्वच ठिकाणी किमान तापमान 2 ते 3 अंशांखाली आले आहे. पुण्यात गेल्या आठवड्यात किमान तापमान हे 18 अंशापर्यत गेले होते. त्या आता घट होऊन 14 अंशापर्यत खाली आले आहे. पश्‍चिम महाराष्ट्र विदर्भ, मराठवाड्यात तापमानाचा पारा सरासरीच्या जवळपास आहे. गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान सरासरीच्या खाली घसरले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.