Dapodi : ‘सीएमई’समोरील भुयारी मार्ग एप्रिल अखेर होणार खुला

एमपीसी न्यूज – जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील (सीएमई) भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्यात आले आहे. हा मार्ग एप्रिल महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार असून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होणार असून नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून पुणे शहरात शिक्षण व नोकरीनिमित्त ये-जा करणा-या विद्यार्थी व नागरिकांची संख्या लाखोंमध्ये आहे. वाहने दापोडी जवळ आल्यानंतर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. दापोडी परिसरात भुयारी मार्गाचे काम दोन वर्षांपासून रखडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. पूल खुला झाल्यानंतर पिंपरीतील नागरिकांना पुणे शहरात जाण्यासाठी सर्व्हिस रस्त्याचा वापर न करता उड्डाणपुलाने जाता येणार आहे. तसेच, बीआरटी मार्गातून बस चालकांनाही अडथळा विरहित बस नेता येणार आहेत. सद्यस्थितीत हा मार्ग पूर्ण होत आल्याने नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

भुयारी मार्गासाठी जानेवारी 2017 मध्ये कामाचे आदेश देण्यात आले होते. मात्र, या मार्गावरील मेट्रोच्या पिलरचे काम सुरु असल्याने भुयारी मार्गाचे काम सहा महिने उशिरा सुरु झाले होते. यामुळे या कामाला पर्यायाने 9 डिसेंबर 2017 ला 9 महिन्यांची पहिली मुदतवाढ देण्यात आली. यानंतरही दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्याने पुन्हा 30 सप्टेंबर 2018 ला दुसरी मुदतवाढ देण्यात आली. दुस-यांदा दिलेली मुदतवाढ 15 जानेवारी 2019 ला संपूनही हे काम पूर्ण होऊ शकले नाही. परंतु, सध्या काम अंतिम टप्यात असल्याने मे महिन्यात नागरिकांसाठी भुयारी मार्ग खुला करण्यात येणार आहे.

रस्त्याची लांबी व रुंदी भुयारी मार्गासाठी सात कोटी 84 लाख रुपये मंजूर झाले आहेत. रस्त्याची लांबी 380 मी, रुंदी 22.3 मी, सब-वे ची रुंदी 11.400 मीटर, उंची 5.5 मीटर व मुख्य रस्त्याची दोन्ही बाजूची रुंदी 9 मीटर इतकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.