Pimpri: समस्या सोडविण्यासाठी आता नागरिकांना पोलीस ठाण्यात पाठविणार – दत्ता साने

पोलीस कारवाईत पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांच्या पाणीपुरवठ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला. त्यामुळे आम्ही कार्यालयात बसणार असून समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना आता पोलीस ठाण्यात पाठविणार  असल्याचे, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सांगितले. पोलिसांनी त्या मार्गी लावाव्यात. तसेच पोलीस दडपशाही करत आहेत. ते राजकीय दहशतीखाली असून सत्ताधा-यांना सहकार्य करतात. कारवाईत पक्षपातीपणा करत असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला. 

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागात आंदोलन केले होते. त्यामुळे पोलिसांनी विनापरवाना जमाव जमवून घोषणाबाजी केल्याचे कारण देत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर दुस-याच दिवशी महापौर निवडीवेळी महापालिकेत मोठा जमाव जमला होता. ध्वनीप्रदुषणाचे उल्लंघन झाले होते. सार्वजनिक मालमत्तेच्या विद्रुपीकरण केल्याचा आरोप करत सत्ताधा-यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी साने यांनी केली होती. तथापि, पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केला नाही. त्यासाठी साने यांनी आज (सोमवारी) पिंपरी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांची भेट घेतली.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना साने म्हणाले की, जनतेसाठी आम्ही आंदोलन केले तर पोलिसांनी विश्वस्त असून आमच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला. त्यामुळे जनतेच्या समस्या आता पोलिसांनीच सोडवाव्यात. पालिकेतील नागरिकांची कामे पोलिसांनी करावीत. नागरिकांची काही कामे असल्यास त्यांना आम्ही पोलीस ठाण्यात जाण्यास सांगणार आहोत. पोलिसांनी ती कामे मार्गी लावावीत. आम्ही केवळ कार्यालयात बसणार आहोत.

पालिकेत दडपशाही सुरु आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन केल्यास गुन्हे दाखल केले जातात. आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात  मोठा राजकीय हस्तक्षेप आहे.  पोलीस राजकीय दबावाखाली काम करत आहेत. भाजपला सहकार्य करतात. पक्षपातीपणा करत  असल्याचा आरोपही, साने यांनी केला. पोलिसांनी सत्ताधा-यांवर जर गुन्हा दाखल केला नाही. तर, ठाण्यात ठिय्या मांडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.