Chakan: पोलीस निरीक्षक गिरीगोसावी यांच्याकडेच चाकण पोलीस ठाण्याचा कार्यभार द्यावा

खेड तालुका कॉंग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – चाकण मधील हिंसाचार रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केल्याने शहरातील बाजारपेठ आणि दुकाने वाचली. त्यामुळे चाकण पोलीस ठाण्याचा कार्यभार पुन्हा पोलीस निरीक्षक गिरीगोसावी यांच्याकडे सुपूर्द करावा अशी मागणी खेड तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
चाकण मधील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची सोमवारी (दि.६) भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्याच प्रमाणे निर्दोष युवकांना त्रास होऊ नये अशी विनंती पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे.

जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते निलेश कड-पाटील व खेड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस यांनी सांगितले कि, चाकण मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या हिंसाचारात काही समाजकंटकांनी चिथावणी देत जाळपोळ केली . संबंधित घटना दुर्दैवी आहे. मात्र सामान्य मराठा समाजाच्या युवकांना ठोस पुरावा असल्याशिवाय अटक करू नये . चाकण येथील मराठा आरक्षण आंदोलनास काँग्रेस पक्षाचा पुर्ण पाठिंबा होता व आहे. तसेच सदर आंदोलनाच्या नावाखाली काही समाजकंटकांनी चिथावणीसह जाळपोळ केली, त्यांचेवर कडक कारवाई करावी .

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना फोन द्वारे याबाबत चर्चा केली असून जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी प्रत्यक्ष पोलीस अधीक्षक यांना भेटून याबाबत लेखी पत्र दिलेले असल्याचेही कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी हिंसाचार नियंत्रण करण्यासाठी केलेल्या कामगिरीचे अभिनंदन करत त्यांनाच चाकण पोलीस स्टेशनचा कायमस्वरूपी कार्यभार देण्याची मागणी निलेश कड, जमीर काझी, चंद्रकांत गोरे पाटील यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.