Akurdi : रेल्वे ट्रॅकवर फिरायला गेलेले दोन मित्र रेल्वेच्या हवेने पडले खड्ड्यात; एकाचा मृत्यू 

एमपीसी न्यूज – रेल्वे ट्रॅकवर दोन मित्र फिरायला गेले. अचानक एक्सप्रेस रेल्वे आली. त्यामुळे दोघेही ट्रॅकला चिटकून थांबले. पण एक्सप्रेसच्या जोरदार हवेमुळे दोघेही बाजूच्या सुमारे 20 फूट खोल खड्ड्यात पडले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 5) दुपारी साडेबाराच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ पुण्याकडील बाजूला झाली.

प्रशांत संभाजी नरवडे (वय 30, रा. गुरुद्वारा चौक, आकुर्डी. मूळ रा. संगमनेर) असे खड्ड्यात पडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर रोहितकुमार विणपतसिंग (वय 22, रा. गुरुद्वारा चौक, आकुर्डी. मूळ रा. पाटणा) असे गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलीस नाईक अनिल बागुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत आणि रोहितकुमार दोघेही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. दोघेजण रविवारी कॉलेजला सुट्टी असल्याने रेल्वे ट्रॅकवर फिरायला आले. आकुर्डी रेल्वे स्थानकावर पुणे-लोणावळा मार्गावर पुणे-कर्जत पॅसेंजर थांबली होती. दोघेही पॅसेंजर मधून उलट दिशेला उतरले. लोणावळा-पुणे ट्रॅकवरून जात असताना प्लॅटफॉर्मच्या 10-15 फूट अंतर पुढे जाताच लोणावळ्याकडून पुण्याच्या दिशेने जाणारी एक्सप्रेस रेल्वे आली. त्यामुळे दोघेही ट्रॅकवरून उतरून रुळाच्या बाजूला थांबले. रूळ आणि त्यांच्यामधील अंतर अगदी कमी असल्याने एक्सप्रेसची जोरदार हवा आली. या हवेमुळे दोघेही ट्रॅकच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यात पडले.

खूप उंचावरून खड्ड्यात पडल्यामुळे दोघेही बेशुद्ध पडले. अर्ध्या तासानंतर रोहितकुमार शुद्धीवर आला. त्यावेळी प्रशांत निपचित पडला होता. त्याने कसाबसा प्रशांतच्या खिशातून मोबाईल काढून मित्रांना फोन केला. दरम्यान स्थानिक नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती. एका स्थानिक नागरिकाने तात्काळ रुग्णवाहिका बोलावली. तोपर्यंत रोहितकुमारचा मित्र घटनास्थळी दाखल झाला. त्यानेही घाईघाईत रुग्णवाहिका बोलावली. आकुर्डी रेल्वे अधिका-यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी रेल्वे पोलिसांना कळविले. रेल्वे पोलीस माहिती मिळताच तात्काळ रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले.

रेल्वे पोलिसांनी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाची रुग्णवाहिका घेऊन आले होते. तर अन्य दोन रुग्णवाहिका खाजगी रुग्णालयांच्या होत्या. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रशांतचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रोहितकुमारची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रेल्वे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.