Blind Football Team : राष्ट्रीय स्तरावरील (अंध) विजेत्या फुटबॉल संघाची अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलला सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज : देणाऱ्याने देत जावे… घेणाऱ्याने घेत जावे… या विंदांच्या ओळी सार्थ ठरवित अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये माई बालभवन संस्थेतील अंध विद्यार्थिनींची सदिच्छा भेट घडून आली. (Blind Football team) माई बालभवन संस्थेतील या विद्यार्थिनी राष्ट्रीय स्तरावरील झालेल्या तामिळनाडू येथील अंध फुटबॉल स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या. या विद्यार्थिनींचा हा आनंद त्यांनी अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांसोबत द्विगुणित केला.

 

 

यावेळी बोलताना  कोमल गायकवाड हिने आपला अनुभव सांगितला. अंध असूनही केवळ सहकार्य आणि प्रयत्नांच्या जोरावर अंतिम सामन्यासह एकूण सहाही फुटबॉलच्या मॅचेस आम्ही जिंकल्या असे तिने सांगितले. इथल्या विद्यार्थ्यांसोबत तसेच शिक्षकांसमवेतही फुटबॉल खेळण्याची इच्छा तिने व्यक्त केली, फक्त डोळ्यांवर पट्टी बांधून खेळण्याची अट तिने घातली, तसेच इथून पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छाही तिने व्यक्त केली. कोमलचे अनुभव कथन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. अंध मुलींना फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण देणारे त्यांचे प्रशिक्षक इंगळे सरही यावेळी उपस्थित होते.

 

प्रत्येकात काहीतरी कमी नाही तर काहीतरी वेगळे असते. माझ्या संस्थेतील प्रत्येक मुलगी ही तेजस्वी आहे, कारण इथे चांगलंच दिलं जातं. जिथे चांगलं दिलं जातं तिथून आऊटपुट ही चांगलंच मिळतो… हे आऊटपुट म्हणजेच माझ्या मुलींचे विजेतेपद आहे. मुलींचे हे यश खूप मोठे आहे, त्यासाठी सर्वस्वी त्यांनीच ती जबाबदारी घेतली आणि तामिळनाडूतील स्पर्धक मुलींना छान उत्तर दिले. समाजासाठी काहीतरी देण्याच्या भावनेतूनच माई बालभवनचं बीज रुजलं गेलं.

 

ज्या मुलींना काही दिसत नाही त्या जिंकू शकतात तर आपण का नाही? ही प्रेरणा शाळेतील विद्यार्थ्यांना मिळावी तसेच समाजाने या दुर्लक्षित घटकांकडे लक्ष द्यावे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे, हा या सदिच्छा भेटीचा उद्देश आहे असे सरांनी यावेळी सांगितले. (Blind Football team) चौथीतील विद्यार्थ्यांच्या हातूनच या विजेत्या सुकन्यांचा सन्मान करण्यात आला. आपल्या मोठ्या ताईंशी बोलून, त्यांची परिस्थितीवर मात करण्याची जिद्द पाहून मुलांचे अंतःकरण भरुन आले. नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असा प्रेरणादायक संदेश या मुलींनी दिला.

 

सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद व अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांच्या हस्ते माई बालभवन संस्थेला सामाजिक कृतज्ञता म्हणून 5000 चा धनादेश देण्यात आला. सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी यावेळी आपल्या ओघवत्या निवेदन शैलीतून माई बालभवन या संस्थेच्या कामाचा परिचय करून दिला. शाळेच्या प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका शैलजा स्वामी, पुर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका  सुब्बलक्ष्मी पाठक व सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते. (Blind Football team) सदिच्छा भेट देणाऱ्या या अंध फुटबॉल विजेत्या सुकन्यांनी जाता जाता शाळेतील मुलांना उत्तम आरोग्य लाभावे, त्यांचे भविष्य उज्वल व्हावे तसेच जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून सामुहिक प्रार्थनेतून आपल्या सदिच्छा दिल्या. ही सदिच्छा भेट शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात घर करून गेली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.